अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा पोलिसांनी नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या कार्यपध्दतीबाबत थेट अभिप्राय नोंदविण्याची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर तब्बल 10 हजार 331 नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. वाहतूक कोंडी, सायबर गुन्हे, महिला सुरक्षितता तसेच अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबाबत नागरिकांनी ठोस प्रतिक्रिया नोंदवत पोलिसांकडून प्रभावी कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, नागरिकांच्या प्रतिक्रिया विचारात घेऊन कामांना प्राधान्यक्रम दिला जाईल. ज्या पोलीस ठाण्यांचे गुणांकन कमी आले आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कार्यपध्दतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी उपस्थित होते.
अधीक्षक घार्गे यांच्या पुढाकारातून जिल्हा पोलीस दलाने नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी विशेष जनमत सर्वेक्षण मोहिम 30 जून ते 9 जुलै या कालावधीत राबविली. यामध्ये क्यूआर कोड व ऑनलाइन लिंकव्दारे नागरिकांना सहभागी करून त्यांचे मत, सूचना व अभिप्राय गोळा करण्यात आले. या आधारे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यात आले. या मोहिमेला जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे अधीक्षकांनी स्पष्ट केले.त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 10 हजार 331 नागरिकांनी अभिप्राय नोंदविला. यामध्ये सर्वाधिक अभिप्राय राहुरी पोलीस ठाणे (671) हद्दीतून तर सर्वात कमी अभिप्राय राजूर पोलीस ठाणे (90 नागरिक) हद्दीतून नोंदविले गेले. सायबर गुन्ह्यासंदर्भात 1 हजार 875 नागरिकांचे अभिप्राय आले.
वाहतुकीची समस्या बाबत 1 हजार 991 नागरिकांचे अभिप्राय नोंदविले. यामध्ये विशेषतः अहिल्यानगर, संगमनेर व श्रीरामपूर शहरातून जास्त नागरिकांचा सहभाग दिसून आला. महिला सुरक्षाबाबत 1 हजार 998 व अंमली पदार्थ संदर्भात 2 हजार 074 नागरिकांचे अभिप्राय नोंदविले आहेत. अंमली पदार्थ कशा पध्दतीने आणि कुठे विकले जातात, याची माहितीही नागरिकांनी दिली. तसेच दारू विक्री, जुगार अड्डे व गुटखा विक्री यासंदर्भातही सूचना प्राप्त झाल्या. काही नागरिकांनी नाव न उघड करता अभिप्राय दिला; तर बहुसंख्यांनी आपले नाव स्पष्टपणे नमूद केले आहे.
पोलीस ठाण्यांनुसार रेटिंग
नागरिकांनी दिलेल्या फीडबॅकनुसार पोलीस ठाण्यांना 1 ते 10 गुण या प्रमाणात रेटिंग देण्यात आले. ते पुढीलप्रमाणे : अहिल्यानगर तालुका 6.0, कोतवाली 5.6, शेवगाव 5.5, तोफखाना 5.4, राहुरी 5.4, खर्डा 5.4, सुपा 5.3, नेवासा 5.3, मिरजगाव 5.3, लोणी 5.3, एमआयडीसी 5.3, कोपरगाव ग्रामीण 5.3, कर्जत 5.3, भिंगार कॅम्प 5.3, आश्वी 5.2, घारगाव 5.2, सोनई 5.2, अकोले 5.1, बेलवंडी 5.1, जामखेड 5.1, पाथर्डी 5.1, संगमनेर शहर 5.1, संगमनेर ग्रामीण 5.1, शनिशिंगणापूर 5.1, कोपरगाव शहर 5.0, श्रीगोंदा 5.0, राजुर 4.9, श्रीरामपूर ग्रामीण 4.7, राहाता 4.7, श्रीरामपूर शहर 4.3, शिर्डी 4.0, पारनेर 3.8.
अंमली पदार्थांविरोधात मोहिम
शासनाने अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांचाही याच मुद्द्यावर सर्वाधिक प्रतिसाद असल्याने पोलीस दल त्याकडे गांभीर्याने पाहत आहे. अंमली पदार्थांची विक्री कोडवर्ड पध्दतीने सोशल मीडियाव्दारे संपर्क करून केली जात असल्याचे लक्षात आले आहे. यामध्ये गांजासह इंजेक्शनचाही समावेश आहे. या साखळीत कोणी अधिकारी किंवा कर्मचारी सापडल्यास त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश आहेत, असे अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट केले.
नागरिकांचा विश्वास, पोलिसांसाठी प्रेरणा
नागरिकांच्या प्रतिक्रिया व टीका ही आमच्यासाठी केवळ आकडेवारी नसून कार्याला दिशा देणारी प्रेरणा आहे. पोलीस दल अधिक प्रभावी, उत्तरदायी व तंत्रस्नेही करण्यासाठी मिळालेल्या सूचनांचा गंभीरतेने विचार केला जाईल, असे आश्वासन अधीक्षक घार्गे यांनी दिले.




