कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 1995 सालच्या एका प्रकरणात दोन वर्षांनी शिक्षा सुनावली होती. कागदपत्रं फेरफार आणि फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झाला आहे.
त्यानंतर आता चर्चा सुरु आहे ती माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीबाबत. याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, या प्रकरणात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे. सुनील केदार यांच्यासंदर्भात पण पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती. त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती. नियमांचे पालन करुन योग्य निर्णय घेतला जाईल. अध्यक्ष म्हणून मी काम करत असताना कायदेशीर तरतुदींचे पालन करुन काम करत असतो.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, संबंधित केसमध्ये इतर सदस्यांच्या विषयांत आपण तपासून पाहा सगळी कायदेशीर प्रक्रिया फॉलो केली गेली होती. त्यानंतर योग्य निर्णय केला गेला होता. यासंदर्भातही सगळी कायदेशीर आणि घटनात्मक तरतुदींचे पालन केलं जाईल आणि मग योग्य निर्णय घेतला जाईल. असे राहुल नार्वेकर म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मानहानीच्या प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठवली असता लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी लगेचच रद्द करण्याची अधिसूचना काढली होती. त्या सुनिल केदार यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावताच त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात आली. मग माणिकराव कोकाटे यांच्याबाबतीत वेगळा न्याय आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी वेगळा न्याय कसा, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.