मुंबई | Mumbai
इराण, इस्राय आणि अमेरिका यांच्यात गेल्या चार दिवसांपासून तीव्र संघर्ष सुरू आहे. त्यामुळे सध्या मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. या संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधला आणि विशेष विमानांची व्यवस्था केली आहे.
या प्रयत्नांचा परिणाम म्हणून स्टार एअर ची दोन विशेष विमाने आज दुपारी फुजैरा एअरपोर्ट वरून उड्डाण घेणार आहेत:
- VTGSO – संध्याकाळी ३.३० वाजता टेकऑफ
- VT GSH – संध्याकाळी ४.३० वाजता टेकऑफ
या दोन्ही विमानांमधून एकूण १६४ प्रवासी आज संध्याकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत मुंबई एअरपोर्टवर दाखल होतील. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज चे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आदी भागातील इतर नागरिकांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच या मराठी नागरिकांशी संवाद साधला होता. “तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना, काळजी करू नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील,” असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांशी अखंड संपर्क साधून या १६४ प्रवाशांना मायदेशी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये
दरम्यान, सीएमओ कडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना राज्य सरकारने माहिती दिली आहे की, आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत.
तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला आहे. मदतीसाठी अडकलेल्या प्रवाशांनी त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आले आहे.
दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक (+97150 365 4357) जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





