कर्जत |प्रतिनिधी| Karjat
आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने कर्जत तालुक्यातील क्रीडा संकुलाच्या अंतिम मान्यतेसाठी महसूल मंत्रालयात आलेली फाईल प्रलंबित असताना ती मंजूर करण्याऐवजी आता या क्रीडा संकुलासाठीची जागा बदलण्याचा घाट विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी घातला आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन जागा न बदलता प्रलंबित असलेली फाईल मंजूर करण्याची मागणी केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून कर्जत-जामखेडमध्ये प्रत्येक विकासकामांत राजकारण रंगत असल्याचे दिसत आहे. आमदार झाल्यानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा आणि विकासकामे करण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार यांच्याकडून होत आहे. यामध्ये रस्त्यांपासून विविध शासकीय इमारतींपर्यंत आणि पाणीपुरवठ्यापासून आरोग्य सुविधांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी कर्जतमध्ये क्रीडा संकुल उभारणीसाठी 6.3 कोटी रुपयांना मंजुरी आणली. मात्र क्रीडा संकुलासाठी योग्य आणि पुरेशी जागा नसल्याने त्यांनी (बर्गेवाडी) येथील जागा मिळवण्यासाठी 2022 पासून पाठपुरावा केला. त्यानुसार या जागेचा तालुका क्रीडा समितीने जिल्हाधिकार्यांना प्रस्ताव दिला.
तो विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आणि विभागीय आयुक्तांनी तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला. मंत्रालय स्तरावर या प्रस्तावाला क्रीडा, वित्त व नियोजन या तिन्ही विभागांनी मंजुरी दिली. त्यानंतर अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गेला, परंतु त्यांनी यावर कोणताही निर्णय घेतला नाही. आता विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे आणि तो प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी त्यांच्याकडे केली. त्यासाठी त्यांनी मंगळवारी (दि.17) मंत्री बावनकुळे यांची मंत्रालयात भेट घेऊन याबाबत चर्चाही केली.
दरम्यान, एकीकडे आमदार रोहित पवार हे कर्जतच्या क्रीडा संकुलाच्या जागेसाठी पाठपुरावा करत असताना, दुसरीकडे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी क्रीडा संकुलासाठीची जागा बदलण्याची मागणी महसूलमंत्र्यांकडे केली असून त्यासाठी त्यांनी बैठकही लावली आहे. यामुळे आमदार रोहित पवार आणि विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या राजकीय खेळात कर्जतच्या क्रीडा संकुलासाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तवात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या जन्मस्थळी चोंडी येथे मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक झाली.
या बैठकीतच कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. परंतु त्यावेळी या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली नाही आणि आता जागा बदलण्याची मागणी सत्तेत असलेल्या सभापतींकडून केली जात असल्याने आमदारांचा पाठपुरावा आणि सभापतींचा खोडा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकारणापायी कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीला ज्या प्रमाणे ब्रेक लागला, तसे या क्रीडा संकुलाबाबत होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.
मतदारसंघात युवांना अद्ययावत क्रीडा सुविधा मिळाव्यात यासाठी माझा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. क्रीडा संकुलासाठीचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी महसूल विभागाकडे असताना आणि महसूलमंत्री सकारात्मक असताना केवळ राजकीय विरोधक सत्तेच्या बळावर त्यात आडकाठी आणत असतील तर ते कर्जत-जामखेडच्या विकासाचे शत्रू आहेत. जागा बदलाची मागणी आज ते करतात पण आजपर्यंत त्यांनी याबाबत काय पाठपुरावा केला? एखाद्या कामात काडीचंही योगदान नसताना दुसर्याच्या कामात मात्र आडवा धोंडा आणणं, हे घटनात्मक पदावरच्या व्यक्तीला शोभणारं नाही. याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्यांच्याकडून हा विषय मार्गी लागेल, ही अपेक्षा.
– आमदार रोहित पवार.




