नवी दिल्ली | New Delhi
भारत आणि वेस्टइंडिज (India vs West Indias) यांच्यात नवी दिल्ली येथील अरूण जेटली स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. यशस्वी जयस्वालने दिल्ली कसोटीच्या पहिल्या दिवशी १७३ धावांची खेळी साकारली आणि दिल्ली कसोटी सामन्याचा पहिला दिवस गाजवला. तर कर्णधार शुभमन गिलने देखील शतकी खेळी साकारली. यानंतर आज (शनिवार) भारतीय संघाने २ बाद ३१८ वरून पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र सामन्याच्या दुसऱ्या षटकांत यशस्वी जयस्वाल १७५ वर धावबाद झाला. यशस्वी जयस्वालने तंबूत परतल्यावर शुभभन गिलने स्वतःचा आत्मविश्वास खचू न देता शतक झळकावले आणि विक्रमांना गवसणी घातली. शुभमन गिल ने ध्रुव जुरेल सोबत १०२आणि नितीश कुमार रेड्डी सोबत ९१ धावांची भागीदारी रचली. आणि भारतीय संघाची धावसंख्या ५०० पार नेली. नितीश कुमार रेड्डी आणि शुभमन गिलने ९१ धावांची भागीदारी रचली. दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र जवळपास खेळून काढले.
नितीश कुमार रेड्डी ४३ धावांवर बाद झाला. त्याचे अर्धशतक ७ धावांनी हुकले पण शुभमन गिलने कसोटी सामन्यातील आपले नववे अर्धशतक पूर्ण केले. नितीश कुमार रेड्डी तंबूत परतल्यावर शुभमन गिलला साथ देण्यासाठी ध्रुव जुरेल मैदानावर आला. यानंतर शुभमन गिलने कसोटी क्रिकेट सामन्यात १० वे आणि कर्णधार म्हणून ५ वे शतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत ५ वा क्रमांक पटकावला. त्याने सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी साधत रोहित शर्माला मागे टाकले.
शुभमन गिल कर्णधार म्हणून भारतामध्ये पहिलीच मालिका खेळत आहे. कर्णधार म्हणून पहिल्या दोन कसोटी डावात ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा विजय हजारे आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर ही कामगिरी करणारा शुभमन गिल तिसरा कर्णधार ठरला. तसेच २०२३ मध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मध्ये खेळविण्यात आलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात शुभमन गिलने १२८ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिज विरूध्द दिल्ली कसोटी सामन्यात त्याने नाबाद १२९ धावा केल्या. ही त्याची कसोटी क्रिकेट सामन्यातील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ठरली. ध्रुव जुरेल ४४ धावा काढून बाद झाला तर शुभमन गिलने ५१८-५ वर डाव घोषित केला. भारताकडून यशस्वी जयस्वाल १७५, शुभमन गिल १२९ नाबाद, ध्रुव जुरेल ४४ , नितीश कुमार रेड्डी ४३ धावा केल्या.
भारतीय संघाच्या ५१८ या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आलेल्या वेस्टइंडिज संघाला तेज नारायण चंदरपाॅल आणि जाॅन कॅंबेल ने पहिल्या विकेटसाठी २१ धावा जोडल्या. मात्र अष्टपैलू रवींद्र जडेजाने साई सुदर्शन कडे जाॅन कॅंबेलला १० धावांवर बाद केले. आणि वेस्ट इंडिज ने २१ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. तेज नारायण चंदरपाॅल ने अॅलिक अथानजे सोबत दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी १२१ चेंडूत ६६ धावांची भागीदारी रचून संघाची धावसंख्या ८७ वर पोहोचवली. मात्र रवींद्र जडेजा ने के एल राहुल कडे तेज नारायण चंदरपाॅलला ३४ धावांवर स्लीपमध्ये झेलबाद केले. आणि ही जोडी फोडली. शाई होप सोबत अलिक अथांजे सोबत २८ चेंडूत १९ धावांची भागीदारी रचून संघाची धावसंख्या १०६ पर्यंत पोहोचवली.
दरम्यान, चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव ने रवींद्र जडेजा कडे अथांजेला झेलबाद केले. आणि भारतीय क्रिकेट संघाला तिसरा ब्रेक थ्रू मिळवून दिला. अलिक अथांजे तंबूत परतल्यानंतर रवींद्र जडेजा ने रोस्टन चेसला शून्यावर बाद केले. आणि वेस्ट इंडिजला चौथा धक्का दिला. शाई होप आणि केवीन इमलाच ने पाचव्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी रचली आणि संघांची धावसंख्या १४० पर्यंत पोहोचवली. वेस्ट इंडिज संघ अजूनही ३७८ धावांनी पिछाडीवर असून, शाई होप ३१ आणि केवीन इमलाच १४ धावांवर नाबाद आहेत.




