मुंबई | Mumbai
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या (T20 World Cup 2026) अंतिम सामन्यात भारतीय संघाने (Team India) न्यूझीलंडचा तब्बल ९६ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरले. आयसीसी टी-२० विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा भारतीय संघ हा पहिला संघ ठरला आहे.कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास रचल्याने खेळाडूंवर पैशांचाही वर्षाव झाला आहे.
आयसीसीने (ICC) या विश्वचषकासाठी $१३.५ दशलक्ष किंवा म्हणजे अंदाजे ₹१२० कोटींचे बक्षीस ठेवले होते. ही रक्कम गेल्या स्पर्धेपेक्षा जवळपास २० टक्क्यांनी जास्त होती. विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाला ३ दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे २७.५ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. ही रक्कम प्रथम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिली जाईल आणि नंतर बोनस, सामना शुल्क आणि इतर बक्षिसांच्या स्वरूपात खेळाडूंमध्ये त्याचे वाटप केले जाणार आहे.
न्यूझीलंडचा संघ मालामाल तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेलाही मिळाले चांगले पैसे
या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा (New Zealand) अंतिम सामन्यात पराभव केला असला तरी त्यांना प्राईज मनीमध्ये मोठी रक्कम मिळाली आहे. न्यूझीलंडला $१.६ दशलक्ष किंवा अंदाजे ₹१४.७ कोटी रक्कम देण्यात आली आहे.याशिवाय स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेलाही चांगले पैसे मिळणार आहेत. दोन्ही संघांना $७९०,००० म्हणजेच अंदाजे ७.२४ कोटी रुपये बक्षीस देण्यात आले आहे.
सुपर ८ मध्ये पोहोचलेल्या आणि ग्रुप स्टेजमधून बाहेर पडलेल्या संघांना किती पैसे मिळाले?
आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ मध्ये पोहोचलेल्या संघानाही प्राईज मनी मिळाले आहे. यात झिम्बाब्वे, पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांना ३८०,००० डॉलर्स म्हणजे अंदाजे ३४.८ दशलक्ष रुपये बक्षिस देण्यात आले. तर आयसीसीने ग्रुप स्टेजमधून बाहेर पडलेल्या अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, इटली, नामिबिया, नेपाळ, नेदरलँड्स, ओमान, स्कॉटलंड, युएई आणि युनायटेड स्टेट्स यांना $२५०,००० म्हणजे अंदाजे ₹२३ दशलक्ष रुपये मिळाले आहेत.





