नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली. या मालिकेतील पहिला सामना भारताने १४० धावांनी जिंकला. आता दुसरा कसोटी सामना दिल्ली येथील अरूण जेटली स्टेडियमवर पार पडला ज्यात भारताने सोपा विजय नोंदवत मालिका २-० ने जिंकली.
दिल्ली कसोटीत यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात तब्बल ५१८ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात वेस्टइंडीजचा पहिला डाव केवळ २४८ धावांवर गडगडला आणि त्यांना फॉलो-ऑन मिळाला. दुसऱ्या डावात वेस्टइंडीजने भारतीय गोलंदाजांसमोर झुंज देण्याचा प्रयत्न केला आणि ३९० धावा केल्या, परंतु त्यामुळे भारतासमोर फक्त १२० धावांचे सोपे लक्ष्य उभे राहिले. हे लक्ष्य टीम इंडियाने पाचव्या दिवशी सहज पार करत सहज विजय मिळवला. यात साई सुदर्शन आणि शुबमन गिलच्या रुपात भारतीय संघाने दोन विकेट्स गमावल्या. पण दुसऱ्या बाजूला सलामीवीर केएल राहुलने अर्धशतक ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, वेस्ट इंडिजकडून तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज संघाने कडवी झुंज देत सामना पाचव्या दिवसांपर्यंत नेला. सलामीवीर कॅम्बबेलच विक्रमी शतकासोबतच शाए होपने शतक पाहायला मिळाले. जस्टिन ग्रीव्ह्स याने नाबाद अर्धशतकासह जेडन सील्सच्या साथीने दहाव्या विकेटसाठी केलेल्या ७९ धावांची भागीदारीच्या जोरावर ३९० धावा करत भारतीय संघासमोर १२१ धावांचे टार्गेट देत सामना पाचव्या दिवसांपर्यंत नेला.
भारत १२१ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि पहिली विकेट ८ धावांवर यशस्वी जयस्वालची पडली. साई सुदर्शने ३९ धावा केल्या आणि भारताची दुसरी विकेट पडली. शुभमन गिल १३ धावा करुन बाद झाला. के एल राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि ध्रुव जुरेल ६ धावांवर नाबाद राहिला. राहुल ५८ धावा करुन नाबाद राहिला.
भारतीय फलंदाजांचा दबदबा
या संपूर्ण सामन्यात दोन्ही डावात भारताचा दबदबा राहिला. भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या दिवशी भारताने पहिला डाव ५ गडी बाद ५१८ धावा करत घोषित केला. डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने २५८ चेंडूंमध्ये तडाखेबाज १७५ धावा केल्या, ज्यात २२ चौकारांचा समावेश होता. तर कर्णधार शुभमन गिलने अप्रतिम खेळ करत १९६ चेंडूंवर नाबाद १२९ धावा केल्या, ज्यात १६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. वेस्ट इंडिजकडून जोमेल वॉरिकन हा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ३ विकेट्स घेतल्या.
कुलदिप यादवने फिरकीच्या जाळ्यात ओढले
भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ८ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी ४ विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने ३ विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.
गिलच्या कर्णधारपदात प्रथमच क्लिन स्विप
भारताने शुभमन गिलच्या नेतृत्त्वात मालिका जिंकण्यात प्रथमच यश मिळवले आहे. गिलच्या कर्णधारपदात भारताला प्रथमच मालिका क्लिन स्वीप करण्यात यश मिळाले आहे. बांगलादेश मालिकेनंतर आता गंभीरच्या प्रशिक्षकपदाच्या काळात दुसऱ्यांदा मालिका जिंकण्यात यश मिळवले. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध, न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावली होती. इंग्लंडविरुद्ध मालिकेत भारताला बरोबरी करण्यात यश मिळाले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




