श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
जुलै महिन्याच्या सुरूवातीला तालुक्याच्या काही भागात झालेल्या पावसाच्या कमी अधिक ओलीवर शेतकर्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र आता पाण्याअभावी ही पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर तुषार सिंचनाचा आधार घेत सोयाबीन पीक जगविण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र तालुक्यात आहे.
पुरेशा पावसाअभावी तालुक्याचा अजूनही बहुतांशी भाग खरीप पेरणीच्या प्रतिक्षेत आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेला तर जुलैच्या सुरूवातीला तालुक्यात काही ठिकाणीच पाऊस झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पेरणी केलेल्या खरिपातील सोयाबीन, मका, कपाशी यासह ऊस व चारा पिके सध्या पाण्याअभावी सुकू लागले आहेत.
या पिकांना पाणी देऊन जीवदान देण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचनचा वापर करत आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आले तरी देखील तालुक्यात जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणी पातळीतही फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे ज्या शेतकर्यांकडे पाणी उपलब्ध नाही त्यांनी पिके पावसाच्या भरवशावरच सोडून दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
दरम्यान, मागील पाच दिवसांपासून हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र रिमझिम सरी वगळता फक्त ढगाळ हवामान व वारे वाहत आहे. त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. पाऊस न झाल्यास खरिपातील पिकांना याचा मोठा फटका बसून शेतकर्याला दुबार पेरणीला सामोरे जाण्याचे चित्र आहे. अगोदरच कमी ओलिमुळे तालुक्यात अनेक भागात बियाणांची उगवण पूर्णपणे झालेली नाही. त्यात आता लांबलेला पाऊस यामुळे तालुक्यात खरीप पिके संकटात सापडली असून शेतकर्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.