ओडिसा | Odisha
ओडिसामध्ये गेल्या तीन दिवसांपासून भगवान जगन्नाथ यांचा यात्रोत्सव सुरु आहे. याच दरम्यान आज रविवारी पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास यात्रेत चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या दुर्देवी घटनेत तीन भक्तांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक भाविक जखमी झाले आहे. भगवान जगन्नाथाच्या नंदीघोष रथाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली असताना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. बसंती साहू (३६), प्रेम कांती मोहंती (७८) आणि प्रभात दास अशी मृतांची नावे आहेत. तिघांचे मृतदेह पुरी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहेत. तर काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जातेय.
नेमके काय घडले?
रथ यात्रेत चेंगराचेंगरीची दुर्घटना श्रीगुंडिचा मंदिरासमोरील शरधाबली परिसरात घडली. रथावर विराजमान भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. पहाटेपासूनच भक्त मोठ्या संख्येने मंदिर परिसरात जमले होते. दर्शनासाठी झालेल्या धक्काबुक्कीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. काही भाविक जमिनीवर पडले आणि त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. पोलिस आणि स्वयंसेवकांना गर्दी व्यावस्थीत नियंत्रित केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जातेय.
तर, प्रत्यक्षदर्शींच्या मते, गुंडीचा मंदिरासमोर जमलेल्या भाविकांच्या अनियंत्रित गर्दीमुळे हा अपघात झाला. दरम्यान, धार्मिक साहित्य घेऊन जाणारे एक वाहन गर्दीत घुसले आणि यामुळे भाविकांमध्ये भीती निर्माण झाल्यामुळे धावपळ सुरू झाली. यामुळे खाली पडून चिरडल्यामुळे अनेक लोक जखमी झाले. अनेक गंभीर जखमींवर पुरी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेच्या नातेवाईकाने सांगितले की, “जेव्हा ही घटना घडली तेव्हा कोणीही प्रतिक्रिया दिली नाही, ना अग्निशमन दलाचे अधिकारी, ना बचाव पथक, ना रुग्णालयाचे पथक. ही एक अशी शोकांतिका आहे जी शब्दात व्यक्त करता येत नाही.”
चेंगराचेंगरीत तीन जणांचा मृत्यू
रथ यात्रा सुरु असताना झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांतील सर्वजण ओडिसामझील खुर्दा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. प्रेम कांती (७८), प्रभात दास आणि बसंती साहू (३६) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तिघांचा ही मृत्यू जमिनीवर कोसळून अन् गर्दीत चिरडल्या गेल्यामुळे मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाले. दुर्घटनेतील जखमींना तातडीने जवळच्या पुरी सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. रुग्णालयातील डॉक्टरांची टीम सध्या जखमींवर उपचार करत आहे. १२ जण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत, तर एका व्यक्तीला दुसऱ्या रूग्णालायत हलवण्यात आले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




