Sunday, May 19, 2024
Homeब्लॉगसुरुवात घरापासून...

सुरुवात घरापासून…

उपसा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अनेक शहरांमध्ये पाण्याची पातळी खूप खाली गेली आहे. शिवाय देशातले सुमारे 70 टक्के पाणी दूषित आहे. पाण्याच्या वापरासंदर्भातील या समस्येची सुरुवात घरापासूनच होते. फरशी, भांडी, टॉयलेट आदींच्या स्वच्छतेसाठी वापरली जाणारी घातक रसायने पाण्यात मिसळून जमिनीचेही प्रदूषणही होते. सामान्यजनांनी दक्षता बाळगण्याचे ठरवल्यास घरातूनच एका सामाजिक क्रांतीला सुरुवात होईल.

जगात सर्वत्रच पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असताना भूगर्भातील पाण्याचे साठे मात्र कमी कमी होऊ लागले आहेत. भूगर्भातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अनेक शहरांमध्ये पाण्याची पातळी खूप खाली गेली आहे. दक्षिण आफ्रिकेतले केपटाऊन हे शहर भूगर्भातील पाणीसाठा संपलेले जगातले पहिले शहर ठरले. जगात सर्वत्रच भूगर्भातील पाणी उपसण्याचा दर, पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्याच्या दरापेक्षा वाढला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये भूगर्भातील पाण्याचे साठे संपुष्टात आल्यास नवल वाटायला नको. ‘डाऊन टू अर्थ’ या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार, पाण्याच्या कमतरतेबाबत भारताचा जगात तेरावा क्रमांक लागतो. पण लोकसंख्येचा आणि पाण्याच्या वाढत्या मागणीचा विचार करता आपण कधीही वरच्या क्रमांकावर पोहोचू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे सध्या तरी पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून जिरवणे आणि पाण्याचा वापर कमी करणे हाच उपाय दिसतो.

दुर्दैवाने आपल्याकडे या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. ‘कोण करणार या उठाठेवी’ अशी काहीशी वृत्ती असल्यामुळे प्रत्येकाच्या घराशी, कुटुंबातल्या सदस्यांच्या आरोग्याशी संबंधित मुद्दा असूनही या विषयावर सांगोपांग चर्चा होत नाही. वास्तवात मात्र या विषयाकडे समाजाचे लक्ष वेधणे आवश्यक असून घरात पाणी वापरताना, भांडी-कपडे धुताना काळजी घेण्यापासून विचार करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

तसे न झाल्यास नजिकच्या भविष्यात आपल्यालाच परिणाम भोगावे लागणार आहेत. या विषयाच्या मुळाशी जाण्यापूर्वी पाण्याचे प्रदूषण आपल्या घरापर्यंत कसे आले आहे आणि संशोधक त्यावर कसा उपाय शोधत आहेत, हे तपासून घेणे आवश्यक आहे. ‘द एनर्जी अ‍ॅण्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ या संस्थेच्या अहवालानुसार देशातले जवळ जवळ 70 टक्के पाणी दूषित (कन्टॅमिनेटेड) आहे. पाण्याच्या वापरा संदर्भातील ही आणखी एक दखलपात्र समस्या आहे. तिची सुरुवात घरापासूनही होते. फरशी, भांडी, टॉयलेट आदींच्या स्वच्छतेसाठी वापरली जाणारी घातक रसायने पाण्यात मिसळून आपण सांडपाण्याद्वारे ड्रेनेज सिस्टीममध्ये सोडतो. त्यामुळे जमिनीचेही प्रदूषण होते. आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण वापरत असलेल्या उत्पादनांचा भरपूर फेस होतो. हा फेस धुण्यासाठी भरपूर पाणी वापरावे लागते. कपडे, भांडी किंवा त्वचा स्वच्छ होण्यासाठी भरपूर फेस असायला हवा, हा गैरसमज आहे. लोकांनीही तो मनात पक्का करून ठेवला आहे. परंतु फेस न करताही आपल्याला स्वच्छता करता येते. आपण वापरत असलेले उटणे किंवा मुलतानी माती ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. त्यामुळे फेस कमी असेल तर पाण्याची नक्कीच बचत होईल.

या सर्व समस्यांवर उपाय शोधण्यासाठी अनेक संस्थांनी काही प्रयोग केले. ते प्रयोग तात्पुरते यशस्वी होऊन उपयोग नव्हता, तर ‘सस्टेनेबिलिटी’चाही विचार करायचा होता. यावर उपाय म्हणजे स्वच्छतेसाठी ऑरगॅनिक केमिस्ट्रीची रसायने (ऑरगॅनिक केमिकल्स) वापरावर भर दिला जायला हवा. जमिनीच्या प्रदूषणात हातभार नसल्यामुळे ही रसायने ‘इको फ्रेंडली’ ठरतात शिवाय इतर घातक रसायनांप्रमाणे ऑरगॅनिक केमिकल्समुळे वापरणार्‍याच्या त्वचेवर घातक परिणाम होत नाहीत. अशा उत्पादनाची फॅक्टरी ‘झिरो वेस्ट’ तत्त्वावर चालवली जावी यासाठी आग्रही असणे गरजेचे आहे. अधिकाधिक लोकांनी अशा प्रकारची उत्पादने वापरल्यास होणारी पाण्याची बचत मोठी असू शकेल.

या सर्व उत्पादनांसाठी लागणार्‍या पाण्यासंदर्भातही आमच्या संस्थेसहित अन्य काही संस्थांचे वेगळे प्रयोग सुरू आहेत. अशा उत्पादनांच्या उत्पादन प्रक्रियेत भूगर्भातले किंवा औद्योगिक महामंडळाद्वारे पुरवले जाणारे पाणी न वापरता समुद्राच्या पाण्याचा वापर करता येईल का, याबाबतही संशोधन आणि प्रयोग सुरू आहेत. ते यशस्वी झाल्यावर पिण्यायोग्य पाण्याचा वापर आणखी कमी होईल आणि पर्यावरण रक्षणात आणखी हातभार लागू शकेल. हे प्रयोग नक्कीच यशस्वी होतील, याची आम्हाला खात्री आहे.

स्वच्छतेसाठी वापरल्या जाणार्‍या उत्पादनांची देशातील बाजारपेठ 20 अब्ज अमेरिकन डॉलर्सहून मोठी आहे. यात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बस्तान बसवले आहे. देशातील अनेक कंपन्यांनीही या बाजारपेठेत आपापला वाटा जपला आहे. शिवाय स्थानिक पातळीवर उत्पादने तयार करून तिथेच विकणार्‍या असंख्य कंपन्या अनऑर्गनाईज्ड क्षेत्रात आहेत. या क्षेत्राचा बारीक अभ्यास केल्यावर पर्यावरणपूरक आणि पाणी वाचवणार्‍या उत्पादनांची अजूनही मोठी गरज असल्याचे आढळून आले. आखाती देश, काही आफ्रिकन देश आणि इतर बर्‍याच देशांमध्ये पाण्याची कमतरता असल्याने या उत्पादनांना मोठी मागणी असू शकते. शिवाय जगातल्या अनेक देशांमध्ये पर्यावरण आणि पाण्याच्या बचतीबद्दल पुरेशी जनजागृती झाली आहे. या देशांमध्येही अशी उत्पादने विकली जाऊ शकतात. पण सामान्य माणसाला त्याच्या खिशाला परवडतील अशी उत्पादने मिळायला हवीत. बाजारात ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये काम करणार्‍या कंपन्यांची संख्या फारच कमी आहेत. अनेकदा त्यांची उत्पादने महाग असतात. त्यामुळे ती सर्वसामन्यांना परवडत नाहीत. पण अधिकाधिक लोकांनी अशा उत्पादनांचा वापर केल्यास अधिकाधिक पाणी वाचेल आणि पर्यावरण सुरक्षित राहील. म्हणून ही उत्पादने सर्वसामान्यांना परवडणार्‍या दरांमध्ये उपलब्ध करता यावीत यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या