मुंबई | Mumbai
राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि पावसाने मारलेल्या दडीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचे लक्षही आज मुंबईकडे लागले होते. अखेर, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळ परिस्थितीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, राज्यातील दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रामुख्याने शेतकरी आणि दुष्काळजन्य परिस्थितीबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. तर, आजच्या बैठकीत एकूण 5 निर्णय घेण्यात आले आहेत.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
राज्यातील दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष आहेत. दुष्काळ पार्श्वभूमीवर मंत्री बांधावर जाऊन पाहणी करणार असून शेतकऱ्यांपर्यत मदत पोहचवण्याच्या कामात गतीमानता येणार असल्याचे मंत्रिमंडळ बैठकीत ठरवण्यात आले. मदत व पूनर्वसन विभागाने यासंदर्भातील निर्णय घेतला आहे.
मुंबई मेट्रो मार्ग ४, ४ अ व १० प्रकल्पाच्या एकात्मिक कार शेड डेपो करिता जमीन दिलेल्या मौजे मोघरपाडा येथील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मालकी हक्काने विकसित भूखंड वाटप करण्यास मंजुरी. मोघरपाडा सर्व्हे क्र. ३० मधील शेतकऱ्यांना २२.५ टक्के व १२.५ टक्के विकसित भूखंड वाटप होणार. (नगर विकास विभाग)
मुंबईतील खार (प) येथील रामकृष्णनगर मधील म्हाडाच्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास होणार. पायाभूत सुविधा दर्जेदार मिळाव्यात यासाठी या परिसरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या या इमारतींचा समूह पुनर्विकास होणार. (गृहनिर्माण विभाग)
धुळे शहराच्या मंजूर विकास योजनेतील धुळे महानगरपालिका हद्दीतील मौजे देवपूर (ता. धुळे) येथील सर्व्हे क्र. १०३ वरील क्रीडांगण व बगीचा यांचे आरक्षण रद्द करून, ते सार्वजनिक – निमसार्वजनिक विभागात समाविष्ट करण्यास मान्यता (नगर विकास विभाग)
कृषि विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द. सन २००९ चा मंजूर आकृतीबंध तात्पुरता कायम राहणार. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाच्या कार्यभाराचा, उपलब्ध मनुष्यबळाचा, रिक्त पदांचा, विविध संवर्गाच्या आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणेची गरज, शेतकरी केंद्रीत योजनांचा कार्यभार तसेच भविष्यातील प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेण्यात येणार (कृषि विभाग)




