– संदीप जाधव
विवाहित जोडप्यांमध्ये अनेकदा तिसरी व्यक्ती येते, हे आपण सिनेमा, मालिकांमध्ये पाहतो. अशाच एका युवकाचा विवाहित मैत्रीणीशी विवाह करण्याचा इरादा असतो. मात्र, आपले अनाठायी ध्येय प्राप्त करण्यासाठी होणारी फसगत व एकूणच होणारा हास्यकल्लोळ उडणवारा नाट्यप्रयोग मंगळवारी राज्य नाट्य स्पर्धेत अहिल्यानगर केंद्रात पाहायला मिळाला.
नगरच्या वात्सल्य प्रतिष्ठानने सादर केलेल्या ‘ती, तिचा दादला आणि मधला’ या विनोदी नाट्याचे सभागृहात हास्याचे उत्तुंग फवारे उडवले. प्र. ल. मयेकर यांनी लिहिलेल्या या नाटकाला प्रेक्षकांसमोर वेगळ्या ढंगात रंगमंचावर उतरवण्यात दिग्दर्शक नानाभाऊ मोरे यशस्वी झाले. कलाकारांनी आपल्या अभिनयावर विशेष मेहनत घेतलेली दिसली.
निलम आणि जालिंदर हे विवाहित जोडपे. नीलम ही गृहिणी तर जालिंदर ट्रक ड्रायव्हर. सहजच ओळख झालेल्या वीज कर्मचारी चंदनशी निलमचे प्रेम जुळते. मात्र, मर्यादा ठेवून असलेले दोघेही लग्न करण्याचे ठरवितात. मात्र त्यात जालिंदरचा अडथळा असतो. दरम्यानच्या काळात चंदनचा रंगेल काका जालिंदरच्या घरात येतो. त्यालाही निलम आवडते. तो निलमचा काका असल्याचे भासवतो. चंदनला मदत करण्याऐवजी काका निलमशी सूत जुळविण्याचा प्रयत्न करतो. या वेळी घडलेल्या अनेक विनोदांनी रसिकांना मनोमन हसवले. अशातच जालिंदरचा खून करण्याचे ठरते. त्यासाठी आलेला सुपारीबहाद्दर निलमचा मामा म्हणून घरात येतो. तो निलमचा मामा व प्रियकर चंदन हा तिचा भाऊ भासवला जातो! मग काका, चंदन आणि मामा हे सर्वजण मिळून जालिंदरचा काटा काढायचा प्रयत्न करतात. मात्र, या सर्व खटाटोपात जालिंदरचा खून तर होत नाहीच, उलट त्याला सर्वांचा कावा समजतो. निलमलाही पश्चात्ताप होतो. असे हे कथानक.
नानाभाऊ मोरे यांनी दिग्दर्शनाबरोबरच नाटकात भूमिकाही केली. काका हे इरसाल पात्र त्यांनी रंगवले. आपल्या विशिष्ट हावभावांच्या जोडीने त्यांचा कसदार अभिनय प्रेक्षकांनी अनुभवला. वेगवान शारीरिक हालचाली व विनोदी संवाद यांच्या साथीने त्यांनी शेवटपर्यंत रंगमंच गाजवला. निलम हे पात्र पल्लवी दिवटे यांनी साकारले. नाटकाच्या सुरुवातीलाच त्यांनी उत्तम नृत्य केले. अनेक प्रसंगांत त्यांचे हावभाव छान वाटले. मात्र, एक-दोन प्रसंगांत त्यांचा अभिनय कृत्रिम वाटला. त्यांची देहबोली मात्र कमालीची आत्मविश्वासू होती. ट्रक ड्रायव्हर जालिंदरला मोनेश ढाळे यांनी आपल्या रांगड्या भाषेसह रंगमंचावर आणले. प्रतिकात्मक ट्रक चालू करतेवेळी त्यांनी छान अभिनय केला. त्यांचे ग्रामीण भाषेतील संवाद चांगले वाटले. मात्र, त्यात येणारे अस्खलित इंग्रजी शब्द खटकले. एका संवादात ते अडखळले.
चंदन हे पात्र अजय लाटे यांनी केले. जरासा धांदरट व घाबरट चंदन त्यांनी उत्तमपणे दाखविला. चेहर्यावरील हावभावही छान जमले. निलमबरोबरच्या प्रसंगांत हवी असलेली केमेस्ट्री आणखी जुळवता आली असती. पण विनोदी हावभाव त्यांनी उत्तमपणे केले. बाजीराव हे पात्र महेश ढवळे यांनी केले. कमी प्रसंगांत आलेली आपली भूमिका त्यांनी निभावली. वाट्याला आलेले संवाद त्यांनी तडीस नेेले. मामा हे पात्र शुभम घोडके यांनी लिलया पेलले. पहिल्या प्रवेशातच मामाने धमाल उडवून दिली. सडपातळ अंगकाठी असलेल्या मामाने विनोद पिकवण्याची एकही संधी सोडली नाही. ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ या म्हणीप्रमाणे ‘तोंड उघडेल तेव्हा खसखस पिकवेन’ असा चंगच जणू त्यांनी बांधला होता की काय, असे वाटले. त्यांच्या आत्मविश्वासू अभिनयाला सकारात्मक देहबोलीचा चांगली साथ मिळाली. रंगमंचावरील त्यांचा वावर अगदी नैसर्गिक वाटला. संपूर्ण नाटकात मामाच्या अभिनयाने प्रचंड टाळ्या नि शिट्ट्या घेतल्या. प्रकाश योजना गणेश लिमकर व ससोहम दायमा यांची होती. जालिंदरच्या पहिल्या प्रसंगात ट्रक चालू करतेवेळी केलेली प्रकाश योजना भावली. खिडकीबाहेरचा प्रकाशही चांगला वाटला.
नेपथ्याची जबाबदारी अंजना मोरे यांच्याकडे होती. सुखवस्तू घराला शोभेल असे नेपथ्य त्यांनी साकारले. दिवाणखान्यातील सोफासेट, टेबल, भिंतीवरील तसबीरी समर्पक वाटल्या. संगीत संयोजन शैलेश देशमुख यांनी सांभाळले. अनेक प्रसंगात विनोद फुलविण्यात त्यांचा मोठा वाटा. त्यांनी प्रसंगानुरूप संगीत देऊन नाटकात परिणामकता आणली. मामाच्या प्रवेशावेळचे विशिष्ट संगीत खूपच भावले. रंगभूषा चंद्रकांत सैंदाणे यांची होती. मामाला त्यांनी चांगलेच काळवंडवले होते! काका व निलम यांची रंगभूषा समर्पक वाटली. वेशभूषा रोहिमी बिडवे यांनी पाहिली. काका, मामा, निलम यांची वेशभूषा लक्षवेधी होती. रंगमंच व्यवस्था सुशांत थोरात, तनिष्क भंडारी, हर्षदा वाघमारे यांनी सांभाळली. त्यांना तनुजा नरसाळे, करण खेडकर, हर्षिता गायकवाड यांनी साहाय्य केले. निर्मिती सूत्रधार विराज अडगटला होते.
दिग्दर्शक नानाभाऊ मोरे यांनी नाट्य सादरीकरणासाठी मोठी मेहनत घेतली. दिग्दर्शन व नाटकातील पात्र अशी दुहेरी भूमिका त्यांनी पेलली. कलाकारांकडून त्यांनी चांगला सराव करून घेतला. विविध प्रसंगांत पिकलेल्या विनोदांमुळे प्रेक्षक शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून बसले होते. पुढे काय होणार, याची उत्सुकता ताणली जात होती. एका प्रसंगात चंदन घरातून मागच्या दरवाजातून बाहेर पडतो. जालिंदर दुसर्या दरवाजातून आता येतो आणि मुख्य दरवाजा तर वेगळाच. यामुळे मागचा दरवाजा नेमका कोणता याबाबत संभ्रम वाटला. मात्र, दिग्दर्शक मोरे नाटकात हास्याचे उत्तुंग फवारे उडविण्यात कमालीचे यशस्वी झाले. सर्वच कलाकारांची त्यांना चांगली साथ मिळाली. विनोदांच्या खसखशीने प्रेक्षक सुखावून गेले.