संदीप जाधव | अहिल्यानगर
मानवी मूल्यांच्या घसरण झाली की समाजात अस्वस्थता, अस्थिरता पसरते. अनाठायी धार्मिक कट्टरतेने समाज पोखरून गेला आहे. राजकारण, न्याय व्यवस्था आणि धर्मांधता यांच्या वाढत्या गैरवापराने निर्माण झालेल्या भयानक स्थितीत सामान्य माणूस भरडला जातो. एकूणच मानवतावादाला धोक्यात आणणार्या या व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडविणार्यांना मात्र अक्षरशः वेडे ठरवले जाते. त्याला संपविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, माणूस मरतो पण सत्यवादी विचार कधीच मरण नाही, असा सकारात्मक समाजवादी संदेश देणारे ‘..खतरेमे है’ हे दोन अंकी नाटक राज्य नाट्य स्पर्धेत शनिवारी (29 नोव्हेंबर) पाहायला मिळाले. सामाजिक विषमतेवर थेट बोट ठेवल्याने प्रेक्षकांनी टाळ्यांच्या रूपाने नाटकाला चांगला प्रतिसाद दिला.
संगमनेर येथील शांती फाउंडेशनने सादर केलेल्या या नाटकाचे लेखन डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी केले. धार्मिक कट्टरवाद्यांचा वापर करून स्वतःची राजकारण पोळी भाजणार्यांमुळे देश विनाशाकडे जाण्याची भीती या नाटकाने सांगितली. कुठलाही धर्म मानवताविरोधी नसतो. सत्य कायम श्रेष्ठच असते हा सामाजिक विचार देणार्या या संहितेला रंगमंचावर डॉ. मुटकुळे यांनी व्यवस्थित उतरवले. कलाकारांकडून काही चुकाही झाल्या. मात्र, सद्यस्थितीतील व्यवस्थेचे दर्शन नाटकाने प्रभावीपणे मांडले. संजय हे नाटकातील मध्यवर्ती पात्र. स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाची कास धरणारा संजय स्वतःला दिव्यदृष्टी असल्याचे सांगतो. चौथा स्तंभ असल्याचे सांगतो. सामाजिक विषमता निर्माण करणार्या व्यवस्थेला विरोध करणारा तो परिवर्तनवादी पाईक. त्याच्या हातातील विजेरीचा प्रकाश हा व्यवस्थेच्या काळोखातील जणू एक काजवाच. नाटकादरम्यान अनेक प्रसंगांत येऊन तो राजकारण, न्याय व धर्मांधता यातील अनिष्टतेवर बोट ठेवतो आणि नाटक पुढे सरकते.
इस्लाम हा बांधकाम ठेकेदार. त्याला पकडून पोलिसांनी कोठडीत टाकलेले असते. पाकिस्तानच्या इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे त्याच्याकडून वदवून घेतले जाते. अर्थात पोलिसांवर राजकीय दबाव असतो. त्याच्यावर न्यायालयात खटला चालतो. कोळसेकर, हानिफ पठाण, सोनकांबळे हे साक्षीदार इस्लामच्या विरोधात साक्ष देतात. दुसरीकडे हिंदू सनातनी धर्मगुरू स्वामी व राघवेंद्र हे दोघे इस्लामच्या बाजूने साक्ष देतात. पोलिस आयुक्तांचीही साक्ष होते. अॅड. साटम हे सरकारी पक्षाचे, तर अॅड. कुरैशी हे आरोपीच्या बाजूने युक्तिवाद करतात. आरोपीचे वकील विविध पुरावे दाखवितात. त्यानंतर न्यायाधीश निकाल देतात. कटकारस्थानाने सत्तेचा वापर करून इस्लामला दहशतवादी ठरविल्याचे ते सांगतात. न्याय व्यवस्थेतील बदलावरही ते भाष्य करतात. शेवटी इस्लामला दोषमुक्त करतात.
अंतिम प्रसंगांत मानवी मूल्यांची जोपासणा करणार्या संजयला गोळी लागल्याने तो कोसळतो. पुन्हा उठून जणू संदेश देतो की, परिवर्तनवादी माणसाला तुम्ही माराल, पण त्याचे विचार कायम जिवंत राहतील. या दृश्याने नाटकावर पडदा पडतो.
धार्मिक कट्टरतेने पछाडलेल्यांचा व न्याय व्यवस्थेतील त्रुटींचा वापर करून संधीसाधू सत्ताधारी राजकीय फायदा करून घेतात. मात्र, त्यामुळे धर्मवाद, जातीयवाद वाढून समाजात मोठी विषमता निर्माण होते, असे ठळकपणे मांडण्यात डॉ. सोमनाथ मुटकुळे यशस्वी झाले. त्यासाठी परिवर्तनाची कास धरणार्या संजयच्या भूमिकेचा कौशल्याने वापर केला. पोलिस कोठडीतील काही प्रसंगांत कमी आवाजामुळे संवाद प्रेक्षकांना ऐकू येत नव्हते. पोलिस आयुक्त साक्षीदरम्यान मध्येच बाहेर गेले व पुन्हा आले! मात्र, व्यवस्थतेतील अनिष्ठतेवर बोट ठेवून दिग्दशकाने नाटक तडीस नेले.
संजय हे पात्रही डॉ. मुटकुळे यांनी वठवले. सामाजिक मूल्यांचा र्हास होत असल्याची खंत व भविष्कालीन आश्वासकता हे दोन्ही भाव त्यांच्या चेहर्यावर होते. संवादातील चढउतारही उत्तम. शेवटचा प्रसंग चांगलाच भाव खाऊन गेला. इस्लाम हे पात्र ज्ञानेश्वर वर्पे यांनी रंगवले. कोठडीत पत्नी भेटायला आल्यानंतर त्यांचे रडणे अगदी नैसर्गिक वाटले. हावभावांना देहबोलीची त्यांना उत्तम साथ मिळाली. जुबेदाला विजया मांडे यांनी रंगमंचावर आणले. अस्खलीत मराठी, हिंदी संवाद त्यांनी केले. इन्स्पेक्टर जाधव व न्यायाधीश ही दुहेरी भूमिका सूर्यकांत शिंदे यांनी सांभाळली. दोन प्रसंगांत त्यांचे संवाद कमी आवाजात होते. एक समंजस पोलिस अधिकारी त्यांनी दर्शविला. रणखांबे पोलिस व साक्षीदार सोनकांबळे या भूमिका प्रवीण घुले यांनी चांगल्या केल्या. अॅड. साटमच्या भूमिकेत दिनेश भाने आले. त्यांची हताश मुद्रा अस्वस्थता दर्शवित होती. अॅड. कुरैशीला राजू अत्तार यांनी आत्मविश्वासाने उभे केले.
साक्षीदारांची उलटतपासणी घेताना त्यांच्या चेहर्यावरील करारी भाव उत्तम वाटले. हुबेहूब वकील वाटावे असा त्यांचा अभिनय होता. स्वामींना संजय नवले यांनी साक्षीदाराच्या पिंजर्यात आणले. धार्मिक मूल्ये त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितली. कोळसेकर (विठ्ठल शिंदे), राघवेंद्र (सुनील भांडगे), हानिफ पठाण (उदय परदेशी) यांनीही आपले पात्र सांभाळण्याचा चांगला प्रयत्न केला. इन्स्पेक्टर शिर्के यांना दीपक टाक यांनी निभावले. साक्षीदरम्यान ते मधूनच विंगेत गेले, मात्र, उलटतपासणी राहिल्याने वकिलांनी त्यांना पुन्हा बोलावले! संवाद नसणार्या बेलीफला रवींद्र पगार यांनी न्यायालयात उभे केले. याशिवाय टिव्हीवरील दृश्यात इन्स्पेक्टर सावंत (संदीप कोकणे), बात्रा (राजू गोडसे), गृहमंत्री (राजन झांबरे) व रसूल भंगारवाला (वसंतराव बंदावणे) हेही दिसले.
नेपथ्य ज्ञानेश्वर वर्पे व प्रवीण घुले यांचे होते. पोलिस स्टेशन, कोठडी, न्यायालय त्यांनी दाखविले. प्रकाश योजना वसंतराव बंदावणे यांची होती. संजयच्या प्रसंगातील लाईट्स समर्पक वाटले. न्यायालयाच्या एका प्रसंगांत मात्र गडबड झाली! संगीत शंतनू घुले व यश पावसे यांचे होते. गंभीर प्रसांगाचे संगीत योग्य वाटले. नाटकात संगीताचा आणखी वापर करता आला असता. केशभूषा व वेशभूषा वंदा जोशी-बंदावणे यांची होती. संजयची विविध बातम्यांच्या मजकुराची पँट लक्ष वेधून घेत होती. इस्लाम, वकील, इन्स्पेक्टर, स्वामी, जुबेदा यांचीही वेशभूषा छान वाटली. रंगभूषा ज्योती कुलथे यांनी केली. रंगमंच व्यवस्था शांताराम कोल्हे, विठ्ठल शिंदे यांनी पार पाहिली. सामाजिक विषमता व राजकीय व्यवस्थेने झालेली सामान्यांची अवस्था या नाटकाने दर्शविली. देशासाठी घातक असणार्या विविध पैलूंवरही प्रकाश टाकला. सत्याचा विचार कधीच मरण नाही, तसेच कुठलाही धर्म धोक्यात नसून केवळ ‘मानवता खतरे में है,’ असे सांगण्याचा प्रयत्न डॉ. मुटकुळे यांच्या या नाटकाने केला.




