संदीप जाधव | 9225320946
नाटक ही जिवंत कला आहे. या कलेच्या प्रेमात पडलेल्या प्रत्येकजण भान विसरून नाटक करत असतो, जगत असतो. या मनोरंजन माध्यमात नंतर व्यावसायिकता आली. अलीकडच्या काळात सिनेमा, वेबसिरीज, रिल्सच्या विळख्यात पिढी अडकली आहे. कारण नाटक करून पोट भरत नाही, असा त्यांचा समज. काहीअंशी ते खरे असले तरी नाटक जिवंत ठेवणारी मंडळीही कमी नाहीत. चंद्र-सूर्य असेपर्यंत नाटक कधीच नाश पावणार नाही, ते चालतच राहणार हे महत्त्व अधोरेखित करणारी ‘पंचमवेद’ ही कलाकृती रविवारी राज्य नाट्य स्पर्धेत पाहायला मिळाली.
सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या डॉ. राजेंद्र धामणे यांनी लिहिलेल्या या दमदार नाटकाचे दिग्दर्शन प्रा. डॉ. श्याम शिंदे यांनी केले. त्यांना ऋषिकेश सकट यांनी साहाय्य केले. नाटकामधील नाटक प्रेक्षकांनी अनुभवले. नाटकाचा पहिला प्रसंग (बक्षीस वितरण) खरा आहे की तो नाटकातला एक भाग आहे हे समजायला अनेकांना बराच वेळ लागला! डॉ. धामणेंच्या या भरभक्कम संहितेला दिग्दर्शकासह कलाकारांनी योग्य न्याय दिला. नाटकाच्या सुरुवातीलाच राज्य नाट्य स्पर्धेतील अंतिम फेरीतील विजेत्यांना बक्षीस वितरण होते. रंगो, पी. बाळू, नामदेव, निखिल, नयन या युवकांना नाटकातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल रौप्यपदक दिले जाते. नामदेव हा शेतकर्याचा मुलगा. आई-वडिलांचा विरोध असूनही नाट्यशिक्षण घेतलेला नामदेव आपल्या अभिनय कलेला वाव देण्यासाठी मुंबई गाठतो.
तेथेच योगायोगाने त्याला रंगो, बाळू पांचट, निखिल, नयन भेटतात. ते सर्वजण एकत्रच राहत असतात. प्रत्येकजण नाट्यशास्त्राचा पदवीधर असतो. नाटक जगलेल्या सर्वांना करिअर करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. नामदेव अभिनयाबरोबरच लेखनकौशल्यही अजमावत असतो. रंगो वेबसिरीजमध्ये काम करतो. बाळूही चित्रपटात छोटा रोल करत असतो. निखिल अभिनयोबरोबरच म्युझिक अल्बम तयार करण्याचे काम करतो. नयन डेली सोपमध्ये मग्न असते. या सर्वांचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी त्यांच्यात एक धागा मात्र सारखा असतो, तो म्हणजे नाटक. नाटकात पैसे मिळत नाही, याउलट वेबसिरीज-चित्रपटांमध्ये बक्कळ पैसा मिळतो, अशी या कलाकारांची धारणा होते. दरम्यानच्या काळात रंगाने केलेल्या वादग्रस्त भूमिकेमुळे काही गुंड घरी येऊन सर्वांना काळे फासतात. हे पाहून बिथरलेले रंगा, नामदेव व बाळू गावाकडे जायला निघतात.
बसस्थानकावर त्यांची भेट दाजीसाहेब यांच्याशी होते. नाट्यअभ्यासक असलेल्या याच दाजीसाहेबांच्या हस्ते त्यांना पदक दिले गेलेले असते. त्यांची मन:स्थिती दाजीसाहेबांना समजते. तितक्यात निखिलने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे त्यांना समजते. सर्वजण घरी जातात. पाचही कलाकारांची स्थिती, उद्विग्नता पाहून दाजीसाहेब त्यांना नाटकाचे महत्त्व सांगतात. त्यासाठी ते पौराणिक दाखलाही देतात. सर्वांना सहज पाहता येईल व ऐकता येईल असा एखाद्या वेदाची निर्मिती करावी, अशी मागणी इंद्रदेव ब्रह्मदेवाकडे करतात. त्यानुसार नाट्यवेद या पंचमवेदाची निर्मिती झाल्याची कहाणी दाजीसाहेब सांगतात. पाचही जणांना सोबत घेऊन नाटक करण्याचे दाजीसाहेब ठरवतात. तीन महिन्यांनंतर सादर केलेल्या नाटकात पाचही कलाकार नाट्यकर्मींची मानसिकता, आजची स्थिती व नाटकाची महती सांगतात व नाटकातील नाटक संपते. असे हे कथानक.
नाटक जगलेला माणूस ध्येयवेडा असतो. मनोरंजनाची कितीही साधने उपलब्ध असली तरी नाटक ही जिवंत कला आहे हा ठळक विषय दर्जेदारपणे मांडण्यात दिग्दर्शक डॉ. शिंदे यशस्वी झाले. कलाकारांनीही त्यांची कला उत्तमपणे दाखविली. पहिल्या अंकात एकदा वीज गायब झाल्याने व्यत्यय आला.
निवेदिकेची छोटी भूमिका जागृती पाटील हिने केली. तिचा आवाज येत नसल्याची काही प्रेक्षकांची तक्रार होती. अर्थात ही तांत्रिक अडचण होती. दादासाहेबांची भूमिका प्रा. डॉ. सचिन मोरे यांनी केली. नाट्य अभ्यासक दाजीसाहेब सागर अधापुरे यांनी वठविले. धीरगंभीर आणि संयमी अभिनय त्यांनी केला. देहबोलीही प्रसंगानुरूप समर्पक होती. रंगो हे पात्र ऋषिकेश सकट याने केले. त्याने काही विनोदही पेरले. पी. बाळू पराग पाठक याने रंगविला. त्याच्या आत्मविश्वासू संवादांना हावभावांची चांगली जोड मिळाली. त्याचा वावरही अगदी नैसर्गिक वाटला. नामदेव हे पात्र पृथ्वी सुपेकर याने चांगले केले. चेहर्यावर असलेले आशेचे अन् नंतर चिंतेचे भाव त्याला छान जमले. निखिल ही भूमिका तेजस आंधळे याने केली. मद्यप्राशन केल्यानंतरचा त्याचा अभिनय विशेष आवडला.
नयन हे स्त्रीपात्र आकांक्षा शिंदे हिने रंगमंचावर आणले. श्रीमंत घरातील पण करिअरसाठी तडजोड करणारी कलाकार तिने उत्तमपणे उभी केली. आपली भूमिका तिने अगदी सहजच पेलली. शेवंता ही भूमिका स्वाती बोरा यांनी छानपणे मांडली. अभिनयही चांगला केला. याशिवाज जगन्नाथ (सुनील लामदाडे), वडील (प्रा. सुनील कात्रे), आई (राखी गोरखा), गुंडाचा नेता (दीपक ओहोळ), गुंड (मारती गुंजकर व कल्पेश शिंदे) यांनीही आपापल्या भूमिका साकारल्या. नाट्याच्या सुरुवातीलाच अनुष्का बेदरे, तेजस्विनी येनगंदूल, अनुष्का बडवे, रिया मुथियान यांनी सुंदर नृत्य सादर केले.
नेपथ्य दीपक ओहोळ, सुधीर देशपांडे व समीर कुलकर्णी यांनी सांभाळले. झोपडी विशेष आवडली. प्रकाश योजना विक्रम गवांदे व गिता शिंपी यांची होती. संगीत श्रावणी हाडोळे आणि कल्पेश शिंदे यांचे होते. अनेक प्रसंगांत त्यांनी उत्तम संगीत दिले. समुद्र लाटा छान वाटल्या. काव्यलेखन सुनील महाजन व मीहिर कुलकर्णी यांनी केले. संगीतकार पवन नाईक होते. त्यांनीही छान संगीत दिले. पवन नाईक व ऋतुजा पाठक यांनी गायन केले. रंगभूषा व वेशभूषा चंद्रकांत सैंदाणे यांनी केली. त्यांना कुंदा शिंदे यांनी साहाय्य केले. रेकॉर्डिंगची जबाबदारी सारंग देशपांडे यांनी पार पाडली. नृत्य दिग्दर्शन प्रिया ओगले-जोशी यांनी केले होते. एकूणच नाटक जगत असलेल्या दिग्दर्शक डॉ. श्याम शिंदे यांनी डॉ. राजेंद्र धामणे यांच्या संहितेला प्रभावीपणे रंगमंचावर सादर केले. या नाटकाने आता स्पर्धेत रंगत येण्यास सुरुवात झाली आहे.