Sunday, September 29, 2024
Homeनगरराज्य परीक्षा परिषदेकडून आज लघुलेखन परीक्षेचे आयोजन

राज्य परीक्षा परिषदेकडून आज लघुलेखन परीक्षेचे आयोजन

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 26 जून रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर लघुलेखन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे ही परीक्षा रद्द झाल्याने आज शुक्रवारी (दि. 28 जून) ही परीक्षा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभर परीक्षा रद्द होत असून परीक्षा रद्दचे वारे आता महाराष्ट्रातही वाहू लागले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

- Advertisement -

राज्य परीक्षा परिषदेतर्फे सकाळच्या सत्रापासून लघुलेखन (शॉर्टहॅण्ड) परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन लॉग इन करावे लागणार होते. परंतु, बुधवारी दोन्ही सत्रांमध्ये बर्‍याच परीक्षा केंद्रांवर लघुलेखनाची परीक्षा होऊ शकली नाही. परीक्षेसाठी सर्व्हरच्या काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे 26 जून रोजीच्या संपूर्ण दिवसाच्या परीक्षा येत्या 28 तारखेला आयोजित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची परीक्षा त्याच बॅचमध्ये व त्याच वेळेमध्ये होणार आहे.

तसेच बुधवारी दुपारच्या तिसर्‍या व चौथ्या बॅचच्या परीक्षा घेणे योग्य होणार नाही, त्यामुळे त्या रद्द करून दि. 28 रोजी ठेवण्यात येत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांतर्फे सर्व परीक्षा केंद्रांना कळवण्यात आली आहे. परीक्षा परिषदेतर्फे लघुलेखन परीक्षा या ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जातात. त्यामुळे ज्यांच्या परीक्षा लॉगिन होऊन सुरू झालेल्या आहेत, त्यांनी पुढे चालू ठेवाव्यात. तसेच 27 जून रोजीच्या मराठी लघुलेखनाच्या परीक्षा वेळेवर होतील. केवळ बुधवार दि. 26 जून या दिवसभराच्या सत्रातील परीक्षा या 28 तारखेला पुढे ढकलण्यात येत आहेत. यासंदर्भात संस्थाचालकांना कळवण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या