पुणे | Pune
पुण्यातील हिट अँड रन गुन्ह्या प्रकरणाची गंभीर दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस आज पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले होते. त्यांनी संपूर्ण घटनेचा आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आढावा घेत आतापर्यंत काय घडलंय? अशा घडना घडू नयेत म्हणून काय करायला हवे? यावर चर्चा केल्याचे ते म्हणाले.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ”पुण्यात घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये संताप आणि नाराजी पाहायला मिळत आहे. मी पोलीस विभागाची बैठक घेतली. आत्तापर्यंत काय घडले आणि पुढची कारवाई काय करणार या संदर्भात बैठकीत आढावा घेतला.”
पोलिसांनी सर्व घटनेचे पुरावे बाल न्याय मंडळाला दिले. पण तरीही बाल न्याय मंडळाने दिलेला निकाल हा पोलिसांसाठी धक्कादायक होता, असे मोठे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. “मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही अर्ज रिमांडचा सबमिट केला होता, त्यात अतिशय स्पष्टपणे कलम ३०४ नमूद आहे. स्पष्टपणे लिहिले आहे की, हा जो मुलगा आहे तो १७ वर्षे ८ महिन्यांचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झाले, आणि १६ वर्षाच्या वरचे जे मुले असतील त्यांना हेनियस क्राईममध्ये अडल्ट म्हणून ट्रीट केले जाऊ शकते.”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हे ही वाचा : “कुणालाही पाठीशी घालू नका, राजकीय दबावाला बळी पडू नका”; मुख्यमंत्री शिंदेंचे ‘त्या’ प्रकरणासंबंधी पोलिसांना निर्देश
“या अपघातात प्रकरणात पोलिसांनी पुरावे दिले आहेत. कोणत्या हॉटेलात गेला, काय केलं, वयाचे पुरावे दिले आहेच, गाडीचे पुरावे दिले आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि दुरुस्ती दिल्यानंतर ज्युवेनाईल बोर्डाने घेतलेली भूमिका आश्चर्यकारक आहे. त्यामुळे वरच्या कोर्टात अर्ज केला. कोर्टाने या संदर्भात सांगितले की या बाबत ज्युवेनाईल कोर्टात जावे लागेल. या कायद्यात त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार ज्युवेनाईल बोर्डाला आहे. त्यांनी नाही केलं तर आमच्याकडे या. आम्ही अर्ज केला. आज किंवा उद्या या ऑर्डरवर सुनावणी होईल. वरच्या कोर्टाचा दृष्टीकोण पाहता ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड ऑर्डर देतील. नाही दिली तर आम्ही वरच्या कोर्टात जाऊ. या प्रकरणात जिथ पर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची तयारी आहे”, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
“ज्यांनी अंडरएजला दारू दिली त्यांच्यावर पहिल्यांदा अटक केली. चार लोकांना अटक केली. पोलिसांनी त्यांना चार दिवसांची रिमांड दिले. त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. २ लोकांचा मृत्यू होऊन त्यांना सहजपणे सोडलं जाणार नाही. पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल हे काम केलं पाहिजे. पोलीस पुढची कारवाई करत आहे. पोलिसांनी प्रकरण गंभीरपणे घेतले आहे”, असे ही फडणवीसांनी सांगितले.