Sunday, November 24, 2024
HomeनाशिकNashik News: सराफ व्यावसायिक बेपत्ता झाल्याने नाशिक रोडला खळबळ

Nashik News: सराफ व्यावसायिक बेपत्ता झाल्याने नाशिक रोडला खळबळ

नाशिक | प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे गाव येथील रहिवाशी व सराफ व्यावसायिक सुशांत ज्ञानेश्वर नागरे (वय 27) हे गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता झाल्याने शिंदे गाव तसेच नाशिक रोड परिसरात खळबळ उडाली असून संबंधित सराफाचा अद्यापही शोध न लागल्याने पोलिसांसह नागरिक व मित्रपरिवार सर्वच हवालदिल झाले आहे.

याबाबतचे वृत्त असे की, शिंदे गाव येथील रहिवासी सुशांत ज्ञानेश्वर नागरे यांचे शिंदे गाव येथील नायगाव रोडवर सराफी दुकान आहे. रविवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी ते आपल्या वडिलांसोबत घरातून जाखोरी येथील शेतावर जाण्यासाठी निघाले. शेतावर पोहोचल्यानंतर सुशांत नागरे हे वडिलांना म्हणाले की, मी पाणी व खाण्यासाठी काहीतरी घेऊन येतो, असे सांगून आपल्या दुचाकी गाडी ऍक्टिवावर निघून गेले त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी सुशांत अजूनही का आला नाही म्हणून वडिलांनी चौकशी केली मी गावातच असून येत आहे असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर, पुन्हा वडिलांनी वाट बघितली मात्र सुशांत आलेला नव्हता त्यानंतर मात्र त्यांचे वडील ज्ञानेश्वर नागरे यांनी जाखोरी गावात येऊन चौकशी व पाहणी केली असता तिथे कुठे सुशांत आढळून आला नाही.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेनंतर त्यांचा भाऊ व नातेवाईकांनी सुशांतला फोन लावला व मी इथेच आहे थोड्यावेळाने येतो दहा ते पंधरा मिनिटांनी पुन्हा फोन लावला असता सुशांतचा फोन बंद असल्याचे आढळले. कुठेतरी गेला असावा किंवा दोन-तीन तासानंतर तो पुन्हा घरी येईल या आशेने घरचे नातेवाईक वाट बघत होते. परंतु, संध्याकाळी सात वाजले तरी सुशांतचा फोनही बंद व तो कुठे आहे याबाबतचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे नातेवाईक व मित्रपरिवार घाबरले व शोध घेण्यास सुरुवात केली तरीही कुठे न आढळल्याने अखेर त्यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन गाठले व सुशांत बेपत्ता असल्याची खबर दिली.

तसेच, त्यांची दुचाकी गाडी दुसऱ्या दिवशी चांदवड येथील बस स्थानक परिसरात बेवारस आढळून आली त्यानंतर सुशांतचा नाशिक शहर नाशिक रोड तसेच ग्रामीण भागात इतर ठिकाणी शोध घेण्यात आला. त्याचप्रमाणे मित्रपरिवार व नातेवाईक यांच्याशी संपर्क साधून शोध घेतला. मात्र, सुशांत कुठेही आढळून आला नाही त्यानंतर मनमाड चांदवड मालेगाव तसेच राज्याच्या काही भागात व परराज्यात शोध घेण्यात आला व माहिती घेतली तरी सुशांतचा अजूनही संपर्क होऊ शकला नाही. त्याचप्रमाणे, तब्बल गेल्या बारा दिवसांपासून त्याचा फोन बंद असल्याने व संपर्क होत नसल्याने नातेवाईक व मित्रपरिवार हवालदिल झाला आहे.

सुशांत नागरे बेपत्ता झाल्यानंतर नाशिक रोड पोलीस सुद्धा त्याचा शोध घेत आहे. परंतु, अद्यापही कुठे आढळून आला नसून यासंदर्भात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवलदार संतोष पाटील व त्यांचे सहकारी शोध घेत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या