Monday, November 25, 2024
Homeब्लॉगबखरीची नांदी...

बखरीची नांदी…

इसवी सनाच्या पंधराव्या शतकातील युरोपामधील साहसी दर्यावदींपासून, आजच्या प्रज्ञा-प्रतिभा संपन्न युवकापर्यत. जगातील अनेकांना एका भूमीचं अखंड व प्रचंड आकर्षण कायम आहे. ही भूमी म्हणजे अमेरिका. कोलंबसापासून आजवर युरोप आणि जगातील प्रत्येक देशातील माणसं या भूमीवर पोहचली. त्यांची राष्ट्रीय-भाषिक-सांस्कृतिक अशा सर्व प्रकारची ओळख मागे पडून ती अमेरिकन झाली. पृथ्वीवरील हा भूखंड त्याच्या शोधापासूनच वलयांकित ठरला. दुर्दम्य साहस, वैचारिक-धार्मिक-सामाजिक बंडखोरी, जीद्द, झपाटलेपण, अथक परिश्रमशीलता, उद्यमशीलता, हिंसा-क्रुरता इत्यादी सर्व असामान्य मानवी गुणांचे मिश्रण म्हणजे अमेरिका.

युरोपातील दर्यावदींनी या भूभागाचा शोध लावल्यानंतर, युरोपीयन जीवनातील पारंपरिक चौकटीत न बसणारे अनेक लोक येथे पोहचले. त्यांच्या प्रत्येकाच्या दृष्टीनं युरोपातील गोठलेल्या, थिजलेल्या, कुजलेल्या, साचलेल्या जीवनापासून मुक्ती. ही या सर्व लोकांची अंतःप्रेरणा, त्यांना या भूमीकडे घेऊन आली. यामध्ये स्वतःच्या शेतीत घाम गाळून सोनं पिकविण्याची आस असणारे युरोपातील भूदास-अल्पभूधारक होते, तर येथील खाणींमधून सोनं शोधण्याचे स्वप्न पाहणारे भांडवलदारही होते.

- Advertisement -

युरोपीयन चर्चच्या दमनकारी व्यवस्थेला आव्हान देणारे धर्मसुधारक होते,तर पारंपरिक ख्रिश्चन धर्माच्या प्रचार-प्रसाराचा ध्यास घेतलेले धर्मप्रसारक ही होते. युरोपात अमर्याद श्रम करून ही,दोन वेळ पोट भरण्याची भ्रांत असणारे श्रमिक होते, तर गुन्हेगारीच्या भरोशावर मौज-मजेचे जीवन जगू पाहणारे चंगळवादी ही होते. या भूभागावर वास्तव्य करणा-या मूलनिवासी लोकांची अमानवी कत्तल, शोषण, दमन यांच्या पायावर आजच्या या महासत्तेचा कळस दिमाखाने तळपत आहे.

चार शतकांपूर्वी या भूमीवर पोहचलेल्या युरोपीयीन आणि काही प्रमाणात आशियन लोकांनी सर्वप्रथम मूलनिवासी लोकांपासून या भूमीला अमानुषपणे मुक्त केले. सुमारे २३५ वर्षांपूर्वी स्वतःला युरोपातील प्रत्येक राजसत्तेच्या शोषणातून मुक्त करत एका नव्या राष्ट्राची घोषणा केली. भूमी काबीज करण्यासाठी दुस-यांचे स्वातंत्र्यच नव्हे, तर अस्तित्व संपवणा-या या लोकांनी, नंतर स्वतःच्या स्वातंत्र्याचा जाहिरनामा घोषित केला.

अमेरिकेच्या चमकदार इतिहासातील अंधःकार ही तेवढाच महत्वाचा आहे. हे नाकारता न येणारे विदारक वास्तव आहे. निग्रोंना अमानुष गुलामीत जगवलेलाच नव्हे, तर त्यांची सर्वांगीण ओळख कायमची पुसणारा, हाच अमेरिका आज जगातील व्यक्तिस्वातंत्र्याचा सर्वात मोठा पुरस्कर्ता आणि भोक्ता आहे. अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्याने प्रत्येक प्रतिभावंत अमेरिकन माणसाने आज या देशाला जगातील एकमेव महासत्ता म्हणून प्रस्थापित केलं. तसेच याच अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्याने करोनासारख्या महामारीत, त्याला हतबल केलं.

प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार-लेखक मारियो पुझो यांनी आपल्या जगप्रसिद्ध ‘गॉडफादर’ या कादंबरीच्या मलपृष्ठावर प्रत्येक देशातील मानवी समाजाचे एक त्रिकालाबाधीत सत्य सांगितले आहे. ते म्हणजे “कोणत्याही महान भाग्योदयामागे अपराध दडलेला असतो.” ( Behaind Every Great Fortune, There is Crime) अमेरिकेच्या इतिहासाला चपखल बसणारे हे विधान, त्याच्या वर्तमानालाही तेवढेच चपखल बसणारे आहे. हे वास्तव कद्यापि नाकारता येत नाही. असे असले तरी आज अमेरिका,अमेरिकाच आहे. हे देखील कद्यापि नाकारता येत नाही. मानवी इतिहासाचा विचार करता,अमेरिकेचा इतिहासचा चार शताकांचा कालावधी तसा नगण्यच म्हणावा लागेल.

आज त्याच्या इतिहासाचा कालावधी महत्व ठेवत नाही, तर तो आधुनिक जगाचा इतिहास ठरतो. वर्तमान व भविष्यकालीन जगाच्या इतिहासाला घडविणा-या या एकमेव जागतिक महासत्तेचा. आपण ‘बखर अमेरिकेची’ या ब्लॉगच्या माध्यमातून अमेरिकेचा इतिहास ते वर्तमान यांचा परिचय करून घेणार आहोत. चार दशकांचा इतिहास असणा-या अमेरिकेचा इतिहासातील चढ-उतार आणि खाच-खळगे पाहणार आहोत. मी स्वतः आणि आपल्यातील बहुसंख्य जणांना प्रत्यक्ष अमेरिकेला जाण्याचा योग आलेला नाही. यामुळे विविध संदर्भ ग्रंथांच्या माध्यमातून केलेल्या या ब्लॉग लेखनातून आपण अमेरिकेच्या भूतकाळापासून वर्तमानापर्यंतची ही सफर करणार आहोत.

आपण कदाचित अमेरिकेला प्रत्यक्ष भेट देणा-या काही लेखकांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनांचे वाचन केले असणार. यामध्ये त्यांनी पाहिलेली अमेरिकेतील विविध स्थळं, त्यांचे वर्णन आणि त्यांचा इतिहास आपल्या प्रवासवर्णनात नोंदवला आहे. त्यांच्या प्रवासादरम्यान वा अमेरिकेतील वास्तव्या दरम्यान त्यांना अमेरिकन समाजजीवन-संस्कृती यांचा आलेला अनुभव त्यांनी मांडलेला आहे. मात्र त्यांचा हा अनुभवही ते ज्या काळात अमेरिकेत गेले तेंव्हाचा असू शकतो. त्याला स्थल-कालच्या आणि तेथील वास्तव्याच्या अवधीच्या मर्यादा निश्चितच असणार.

अमेरिकन समाज आणि त्याची संस्कृती यांचे आजचे जे स्वरूप आहे. त्याची जडण-घडण समजण्यासाठी या देशाचा इतिहास पाहणे निश्चितच लाभदायक आहे. इतिहास असा उच्चार करताच, अनेकांना वाचण्याचा कंटाळा येतो. याची जाणीव मला आहे. यासाठीच आपण हा इतिहास सनावळया व घटनांची यादी या स्वरूपात न पाहता. तसेच इतिहास लेखनाच्या र्निजीव शब्दजंजाळात न अडकता अत्यंत रंजक पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे अमेरिकेची ही मनोरंजक बखर वा गोष्ट आपणास निश्चितच आवडेल अशी खात्री आहे आणि तशी खात्री मी आपणास बखरीच्या नांदीतच देत आहे.

-प्रा.डॉ.राहुल हांडे

भ्रमणध्वनी – ८३०८१५५०८६

(लेखक धर्म, इतिहास व साहित्याचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या