Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याप्लायवुडवर पेव्हर ब्लॉक बसविण्याचा अजब प्रकार उघडकीस

प्लायवुडवर पेव्हर ब्लॉक बसविण्याचा अजब प्रकार उघडकीस

नवीन नाशिक । प्रतिनिधी

महानगरपालिका निवडणूक एक वर्षावर येऊन ठेपली असताना आपण किती विकास कामे केली याचा दिखावा करण्याकरता प्रभाग 29 मध्ये चक्‍क पावसाळी गटारीवरील ढाप्यांवर लाकूड टाकून पेव्हर ब्लॉक बसविण्याचा घाट घातल्याचा प्रकार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे उघडकीस आल्याने नगरसेवका विरोधात नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

- Advertisement -

प्रभाग 29 मधील बजरंग चौक, साईबाबा नगर, घुगे मळा या ठिकाणी पावसाळी गटारीचे काम मागील काही दिवसांपूर्वी करण्यात आले आहे. त्यानंतर पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचू नये म्हणून या गटारींवर जाळीचे ढापेही बसविण्यात आले. ढापे बसविल्यानंतर हे काम संपले असावे असे वाटत होते. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून याठिकाणी अजबच प्रकार बघावयास मिळाला आहे.

या जाळीच्या ढाप्यांवर चक्क प्लायवूडचे तुक्‍डे टाकून त्यावर कच टाकून पेव्हर ब्लॉक बसविण्याचा प्रकार घडल्याने ठेकेदाराचा कामचलाऊ पणा उघडकीस आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांसह शिवसेनेचे विभाग प्रमुख सुयश पाटील यांनी याबाबत आवाज उठविला. पावसाळी गटारींवर ढापे बसवून नगरसेवकांना कोणता विकास साधायचा आहे असा प्रश्न परिसरातील नागरिकांसह शिवसेनेने उपस्थित केलां आहे. सदर कामे हे चुकीचे आणि निकृष्ट दर्जाचे होत असून यातून जनतेच्या पैशाचा सर्रासपणे दुरुपयोग होत असल्याचा आरोप होत आहे.

याबाबत विभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केलीं असता त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने शिवसेनेच्यावतीने थेट उपायुक्‍तांना निवेदन देण्यात आले आहे. हे काम त्वरित बंद करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकून या कामावर देखरेख करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अन्यथा यावर शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा शिवसेना विभागप्रमुख सुयश पाटील, विभागप्रमुख निलेश साळुंखे, उपविभागप्रमुख मॉन्टी दळवी, आबा पाटील, शाखाप्रमुख निखिल चौधरी आदींनी दिला आहे.

या कामाच्या निकृष्ठ दर्जाची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली होती. यावरून भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे यांनी पत्रकार परिषद बोलवून शिवसेनेचे पाटील यांच्या विरोधात ठेकेदाराकडून खंडणी मगितल्याचा आरोप केला होता. तर पावसाळी गटारीवर प्लायवूड टाकून पेव्हर ब्लॉक बसविण्याचे विचित्र काम ठेकेदाराकडून केले जात असून त्याला नगरसेवक शहाणेंनी पाठिंबा दर्शविणे म्हणजे ठेकेदारासोबत त्यांचे लागेबंधे असल्याचे सिध्द होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या