शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
जिल्ह्यातील जलसंपदा, जलसंधारण, पाटबंधारे व बांधकाम विभागाच्या ओढे-नाले, चार्या, तलाव, कालवे, बंधारे, रस्ते व पूल यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. यामुळे पाण्याला अटकाव होऊन पूरपरिस्थिती निर्माण होते. हे अतिक्रमण तात्काळ हटविण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवावी, असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. अहिल्यानगर जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे तातडीची बैठक घेतली. रविवारी दिवसभरात ना. विखे पाटील यांनी शिर्डी मतदार संघातील विविध गावांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून त्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
सायंकाळी उशिरा शिर्डी संस्थानच्या सभागृहात वरिष्ठ अधिकार्यांसह त्यांनी बैठक घेतली. या बैठकीला साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, सायली पाटील, प्रदीप हापसे, स्वप्निल काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आदी उपस्थित होते.
ना. विखे पाटील म्हणाले, जलसंपदा व जलसंधारण विभागाने जिल्ह्यातील पाणी साठ्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी समन्वयातून कृती आराखडा तयार करावा, ओढे-नाले व चार्यांचे व्यवस्थित मोजमाप करून अतिक्रमण हटविण्यात यावे. पाथर्डी व शेवगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये मिळून अंदाजे 1 लाख हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. जामखेडमध्ये 60 हेक्टर क्षेत्र आणि राहाता तालुक्यात अंदाजे 40 हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. जिल्हा प्रशासन सतर्क असल्यामुळे मनुष्यहानी कमी झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले आहे. जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, साई आश्रम अशा ठिकाणी पुरग्रस्तांना तात्पुरता निवारा देण्यात आला आहे. प्रशासन, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून पुरग्रस्तांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
पुरग्रस्तांना दिल्या जाणार्या सुविधांवर लक्ष ठेवण्याचे काम प्रशासनाने करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. शिर्डीत 2020 आणि 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीवर धडा घेऊन मोठ्या प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कालच्या पावसात शिर्डीत कमी नुकसान झाले. नगरपालिका प्रशासनाने तत्परतेने मदतकार्य राबविले. शिर्डी-लोणी महामार्गावरील बायपासवर असलेले गतीरोधक तात्काळ हटविण्यात यावे. महावितरणची डीपी पाण्यात गेली तरीही वीज पुरवठा खंडित करण्यात आला नाही. ट्रान्सफॉर्मर पाण्याच्या प्रवाहात असतील तर तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करावी. कृषी व महसूल विभागाने सरसकट पंचनामे करावेत, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या. आरोग्य विषयक उपाययोजनांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.





