Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याअल्पसंख्याक समाजाकडून उद्धव ठाकरेंना बळ?

अल्पसंख्याक समाजाकडून उद्धव ठाकरेंना बळ?

नाशिक । फारूक पठाण Nashik

जून 2022 मध्ये महाराष्ट्रात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षात बंडखोरी झाली. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड पुकारले. नंतर भाजपसोबत युती करून थेट राज्याची सत्ता काबीज केली. सत्ता आल्यानंतर खरी शिवसेना आमचीच, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. 2019 साली सत्तारूढ झालेले महाविकास आघाडी सरकार व अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेली विकास कामे, यामुळे राज्यातील दलित, मुस्लिम आदी अल्पसंख्यांक समाज मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे आकर्षित झाल्याचे जाणवत आहे. यामुळे खरी शिवसेना कोणाची या लढाईत अल्पसंख्याक समाजाकडून (Minority community) उद्धव ठाकरे यांना बळ मिळत असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

राज्यासह देशात सुमारे 20 टक्के मतदार मुस्लिम समाजाचे असल्याचे बोलले जाते. दलित समाजाचीदेखील निर्णायक लोकसंख्या आहे. 2014 सालापूर्वी ज्या पक्षासोबत दलित, मुस्लिम अल्पसंख्यांक उभे राहिलेले आहेत त्या पक्षाची देशासह राज्यातदेखील सत्ता निर्माण झाली आहे. मात्र 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी लाटेत देशाचे वातावरण बदलले आहे. ’जो हिंदू हित की बात करेंगा, वही देश मे राज करेंगा ’ या पद्धतीने देशाचे राजकारण सुरू झाले.

यामुळे अल्पसंख्यांक समाज काही प्रमाणात दुर्लक्षित झाल्याचे दिसून आले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. त्यामुळे दररोज राजकारण कलाटणी घेत आहे. भाजपने महाविकास आघाडी सरकार पाडून आपली सत्ता आणली. त्यामुळे 2024 साठी मोदींना मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला असला तरी उद्धव ठाकरे यांच्या रूपाने अल्पसंख्यांक मतदारांना एक नवा पर्यायदेखील निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. देशात सुमारे सात दशके काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता होती.

या काळात मुस्लिम समाजाचा जसा विकास व्हायला हवा होता तसे झाले नसल्याचे आरोपदेखील केले जात आहेत. मात्र काँग्रेसला पर्याय नव्हता. यामुळे देखील मुस्लिम समाजाची ’वोट बँक’ यांच्याकडे आबादीत होती. मात्र मागील काही काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तेलंगानामध्ये टीआरएस, बिहारमध्ये लालूप्रसाद यांची आरजेडी तर नितीश कुमार यांच्या जेडीयु असे प्रादेशिक पक्ष तयार झाले. त्यांची धोरणे काँग्रेसप्रमाणेच सर्व समावेशक आहेत. अशा पक्षांमध्ये जातीय राजकारण चालत नसल्याचा दाखला देत मुस्लिम समाजाने त्यांनाही मतदान करायला सुरुवात केली. त्यामुळे अशा पक्षांची सरकारे त्यांच्या राज्यात आली आहेत, अशा आजवरचा अनुभव आहे.

देशात काही प्रमाणात अल्पसंख्यांक समाज भाजपसोबत असला तरी मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समाज भाजपला मतदान करीत नसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. यामुळे भाजपविरोधी अनेक प्रादेशिक पक्षांना वेळोवेळी अल्पसंख्याक समाजाने मतदानातून दिल्याचे दिसून आले आहे. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडेसुद्धा अल्पसंख्याक समाज आकर्षित झाला आहे. मुख्यमंत्री असताना केलेली कामे तसेच सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा मानस यामुळे अल्पसंख्याक समाजाकडून उद्धव ठाकरे यांना बळ मिळणार आहे.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत?

’हिंदुत्वाच्या रक्षणासाठी’ असे ब्रीदवाक्य असणार्‍या शिवसेना पक्षाची वाटचाल तशी कठीण आहे. मात्र बाळासाहेबांनी राज्यात युती सरकार आल्यावर मुंबईतील मशिदींच्या चटई क्षेत्रात केलेली वाढ तसेच साबीर शेख असो की पक्ष संघटनेत इतर मुस्लीम, सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे. त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे पुढे जाताना दिसत आहेत. यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येऊन ठाकरे यांचा चेहर पुढे केला व एकत्रित निवडणूक लढले तर उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचेदेखील उमेदवार होऊ शकतात. कारण प्रखर हिंदुत्ववादी पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. दुसरीकडे ते सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भाषा करतात. याचा फायदा त्यांना मिळू शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या