Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसंभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घ्यावा - राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश

संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घ्यावा – राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश

राज्यातील महापालिका आयुक्तांसोबत बैठक

मुंबई / प्रतिनिधी

- Advertisement -

महापालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्या वेळीदेखील दक्षता घ्यावी. प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती आणि सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा. याशिवाय प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका निर्दशनास आल्यास तक्रारींचा वाट न पाहता स्वत:हून दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गुरुवारी येथे दिले.

YouTube video player

मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील मतदार याद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी वाघमारे यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सर्व आयुक्तांची बैठक घेतली. प्रारूप मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत ३ डिसेंबर २०२५ पर्यंत होती. त्यानुसार दाखल हरकती आणि सूचनांवर निर्णय घेऊन १० डिसेंबर २०२५ रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करावयाच्या आहेत. तत्पूर्वी सर्व हरकती आणि सूचनांवर योग्य ती कार्यवाही करून वेळेत निपटारा करावा, अशी सूचना वाघमारे यांनी केली.

संभाव्य दुबार मतदारांची यादी संबंधित महानगरपालिकेने आपल्या सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी. मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर दोन स्टार (**) दर्शविण्यात आलेले आहेत. असा मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत त्यांना आवाहन करण्यात यावे. आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्या मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घ्यावा. अशा मतदाराने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले.

संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास तो मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. हमीपत्राबरोबरच त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल, असेही वाघमारे यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...