Saturday, November 23, 2024
Homeनाशिकरेल्वे रुळावरून विद्यार्थ्यांचा प्रवास

रेल्वे रुळावरून विद्यार्थ्यांचा प्रवास

भुयारी मार्गाच्या दुरवस्थेने जीव धोक्यात घालत जावे लागते शाळेत

मनमाड । बब्बू शेख Manmad

रेल्वे प्रशासनाने नव्याने बांधलेल्या भुयारी मार्गाजवळ झालेले मोठमोठे खड्डे आणि त्यात साचलेले पाणी, चिखलामुळे रूळ ओलांडून शाळेत जाण्याची वेळ परिसराच्या गावातील शेकडो विद्यार्थ्यांवर आली असल्याचा धक्कादायक प्रकार मनमाडपासून जवळ असलेल्या वागदर्डी गावासमोर आला आहे.

- Advertisement -

दररोज विद्यार्थी शाळेत जाताना आणि परत येताना दोन्ही रूळ ओलांडत अक्षरशः जीव धोक्यात घालून ये-जा करत असल्याने भुयारी मार्ग असून अडचण नसून खोळंबा ठरला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या भुयारी मार्गाची उंची वाढवण्यासोबत खड्डे बुजवून पाणी तुंबणार नाही अशी व्यवस्था करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसोबत वागदर्डी येथील अशोक बिडगर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

मनमाडपासून चार कि.मी. अंतरावर वागदर्डी येथे असलेल्या माध्यमिक विद्यालयात रापली, वडगाव यासह इतर गावांतील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत आहे. शाळेपासून जवळ मुंबई आणि भुसावळकडे जाणारी अप-डाऊन दोन रेल्वे रूळ आहेत. एका बाजूला शाळा तर दुसर्‍या बाजूला गाव असल्यामुळे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी भुयारी मार्गाचा वापर करतात. याअगोदर हा भुयारी मार्ग इतका मोठा होता की त्यातून केवळ विद्यार्थी आणि ग्रामस्थच नव्हे तर चारचाकी, दुचाकी वाहनेदेखील जात होती.

मात्र गेल्या वर्षी रेल्वे प्रशासनाने जुना मार्ग बंद करून त्याजागी नवीन मार्ग तयार केला आहे. मात्र या मार्गाची उंची इतकी कमी करण्यात आली आहे की त्यातून वाहन तर सोडाच माणसालादेखील उभे राहून जाता येत नाही. त्यामुळे वाकून या मार्गातून जावे लागते.
.
नवीन मार्ग तयार करताना दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे करण्यात आले होते. ते खड्डे मात्र रेल्वे प्रशासनातर्फे बुजवण्यात आले नाही. त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यात इतके पाणी आणि चिखल साचतो की त्यातून मार्ग काढणे कठीणच नव्हे तर अशक्य झाले आहे. भुयारी मार्गाने जाताच येत नसल्याने नाईलाजाने जीव धोक्यात घालून हे दोन्ही रूळ ओलांडून शाळेत शिक्षण घेण्यासाठी जावे लागण्याची वेळ ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांवर आली आहे. एखादी मोठी अप्रिय घटना घडण्याची वाट न पाहता रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गाचे खोलीकरण करून उंची वाढवण्यासोबत पाणी तुंबणार नाही याची व्यवस्था करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या