सौ.वंदना अनिल दिवाणे
सप्टेंबर – 2023
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी गुरु-राहू-हर्षल, चतुर्थात रवि, पंचमात मंगळ-बुध-शुक्र, सप्तमात केतू, दशमात प्लुटो, लाभात शनि, व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.
तुमची रास – राशीची आद्याक्षरे श्रू, चे, चो, ला, ली, लू, लो, ले अशी आहेत. राशीचे चिन्ह मेंढा आहे. राशी स्वामी-मंगळ, तत्व-अग्नी, चर राशी असल्याने स्वभाव अतिशय चंचल. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग-पुरूष, वर्ण- क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, पित्त प्रकृती. राशीचा अंमल डोक्यावर असल्याने डोक्याला इजा होऊ नये याची काळजी घ्यावी. शुभ रंग-लाल, शुभ रत्न-पोवळे, शुभ दिवा-मंगळवार व रविवार. देवता-शिव, भैरव, मारोती. शुभ अंक-9, शुभ तारखस-9/18/27. मित्र राशी-सिंह,तुला,धनु. शत्रु राशी-मिथून, कन्या. स्वभाव अत्यंत क्रोधी. कुटुंबाचे उत्तम प्रकारे पालनपोषण कराल. आव्हान स्वीकारण्याची खुमखुमी.
व्ययस्थानी नेपच्यून आहे. संशोधनासारख्या कामात चांगले यश मिळेल. गुप्तहेर खात्यातील कर्मचार्यांना आरोनी टिपण्यात यश मिळेल. सामाजिक मान्यता मात्र त्या प्रमाणात मिळणार नाही. हॉस्पिटल व तुरुंगाशी संबंधित कामापासून लाभ होतील. लोकोपयोगी काम करण्यात फार आनंद वाटेल.
स्त्रियांसाठी – पती पत्नीचे आपसात प्रेम राहील. शत्रुसमान नातेवाईकांच्या गुप्त कारवाया उघडकीस आणण्यात यश मिळेल. डामडौल दाखविण्यासाठी वायफळ खर्च करू नये. काटकसर करावी.
विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.
शुभ तारखा – 1, 3, 4, 7, 8, 10, 11, 16, 17, 18, 19, 22, 24, 26, 27, 29, 30
ऑक्टोबर – 2023
महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी -गुरू-राहू-हर्षल, चतुर्थात -शुक्र, पंचमात रवि-बुध, षष्ठात मंगळ, सप्तमात केतू, दशमात प्लुटो, लाभात शनि, व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.
लाभस्थानी शनी आहे. हा शनी भरपूर लाभ देईल. धनप्राप्तीच्या बाबतीत साडेसातीतून तूर्त सुटका झाल्याने याची प्रचिती येईल. तुमच्या तेजस्वीपणाला धार चढेल. कुरघोडी करणारे शत्रू एक तर नष्ट होतील किंवा सरळ वागू लागतील. धनसंग्रह करणे शक्य होईल. सत्संगाची गोडी वाटेल. स्त्रियांना आवश्यक असलेल्या वस्तूंचा व्यापार करणार्या व्यापार्यांना विशेष लाभ होईल. संततीच्या बाबतीत मात्र काही चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. मुलांच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या. स्त्री कडील नातेवाईकांकडून किंवा लबाड मित्रांकडून फसवणूक संभवते.
चतुर्थस्थानी शुक्र आहे. आनंदी वृत्ती राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. न्यायीपणामुळे लोकप्रियतेत वाढ होईल. आपल्या कार्यात प्राविण्य संपादन कराल. आकर्षक व मधुर बोलण्यामुळे घरात व बाहेर खेळीमेळीचे वातावरण राहील. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. मातेची सेवा कराल.
स्त्रियांसाठी – चतुर्थात शुक्र आहे. महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. हे मात्र धोक्याचे राहील. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.
विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.
शुभ तारखा – 1, 6, 7, 8, 10, 20, 21, 22, 23, 24, 26
नोव्हेंबर- 2023
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी गुरू-राहू-हर्षल, चतुर्थात रवि, षष्ठात शुक्र, सप्तमात मंगळ-बुध-केतू, दशमात प्लुटो, लाभात शनि, व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.
राशीच्या तनुस्थानी हर्षल असल्याने धाडसाकडे कल राहील. स्वभाव कमालीचा लहरी व चंचल एवढेच नाही तर इतरांना विचित्र वाटेल असा राहील. राजकारणात असाल तर भाषणात श्रोत्यावर आश्वासनांचा पाऊस पाडाल. मात्र जनता त्यावर भरोसा ठेवेल असे नाही. स्वतःला कितीही फीलगुड वाटले तरी इतरांना वाटेलच असे नाही. लोकाचार व रुढीविरुद्ध वर्तन ठेवण्यात भूषण वाटेल. स्वभाव क्षणात शांत तर क्षणात उच्छृंखल असा राहील.
लग्नी गुरू आहे. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यक्तीमत्व प्रभावशाली राहील. संसारात फार चातुर्याने वागाल. धार्मिक ग्रंथ वाचण्याची आवड वाटेल. शरीरप्रकृती चांगली राहील. नावलौकीकात भर पडेल. कायद्याबाहेर जाणे आवडणार नाही. वाढत्या वयाबरोबर शरीर स्थूल होण्याची शक्यता आहे. नियमीत चालण्याचा व्यायाम करा. वरिष्ठांच्या कृपेने उच्चपद प्राप्ती होईल. हाताखालच्या लोकांकडून काम करून घेण्याची कला अवगत राहील. सरळ स्वभाव राहील. विद्याव्यासंगात फार रस राहील. न्यायी व समतोल स्वभावामुळे लोकप्रियता मिळेल.
स्त्रियांसाठी – महिलांना पतीराजांचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल. मात्र कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळणे जास्त चातुर्याचे ठरेल. उत्साह चांगला राहील. कलाकौशल्यात प्रगती
विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांना अभ्यासाच्यादृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परीक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही.कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्यादृष्टीने फायद्याचे राहील.
शुभ तारखा – 1, 2, 3, 5, 6, 12, 14, 15, 16, 18, 21, 22, 25, 28, 29