सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
सिन्नरसारखा दुष्काळी व अशिक्षित तालुका शिक्षित व्हावा यासाठी सारडा परिवाराने उदार हस्ते देणगी देत शाळेला भव्य अशी इमारत बांधून दिली. मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्र देवो भव या भावनेतून सारडा परिवाराचे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातही भरीव योगदान असल्याचे प्रतिपादन शेठ ब. ना. सारडा विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पंडित यांनी केले.
वै. बस्तीरामजी सारडा यांच्या ५९ व्या पुण्यतिथीनिमित्त सारडा विद्यालय व दै. ‘देशदूत’ यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे विद्यालयाच्या प्रांगणातील वै. बस्तीरामशेठ सारडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर चांडक कन्या विद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पंडित बोलत होते.
दै. ‘देशदूत’चे कॉर्पोरेट विभागाचे व्यवस्थापक संदीप राऊत, संजीवनी शालेय समितीचे अध्यक्ष अनिल करवा, निवृत्त प्राचार्य दीपक जाधव, रावसाहेब आढाव, सचिन कोकाटे, जुगल लोया, किरण भंडारी, सुरेंद्र क्षत्रिय, मुन्ना लोया, जनकल्याण रक्तपेढीचे गोविंद कुलकर्णी, सारडा विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक बाळासाहेब वाघ, चांडक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा महाले, संजीवनीच्या मुख्याध्यापिका करंबळेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
नगरपालिकेने चालवलेली न्यू इंग्लिश स्कूल नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने ताब्यात घ्यायला यंदा 100 वर्षे पूर्ण झाले असून त्या अर्थाने हे शाळेचे शतकमहोत्सवी वर्ष आहे. 1966 पर्यंत ही शाळा मुली व मुलांसाठी एकत्र भरत होती. मात्र सारडा परिवाराच्या प्रयत्नांमुळे चांडक कन्या ही मुलींची स्वतंत्र शाळा 1 सप्टेंबर 1966 ला सुरू झाली. सारडा परिवाराने संगमनेर येथे महाविद्यालय बांधून दिले. नाशिकला रामप्यारीबाई सारडा यांच्या नावाने शाळेला प्रशस्त इमारत बांधून दिली. सन 1970 पर्यंत सिन्नरमध्ये फक्त 10 वीपर्यंतच शाळा होती. अकरावीसाठी नाशिकला जावे लागायचे. सन 1972 मध्ये उभ्या राहिलेल्या सिन्नर महाविद्यालयासाठी सारडा परिवाराने आपल्या गुरूंच्या, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच्या नावाने इमारतीसाठी भरीव मदत केली.
सारडा परिवाराने 1985 मध्ये नाशिकला त्र्यंबक रस्त्यावर वेदमंदिराची उभारणी केली. त्र्यंबकला वेदशाळा सुरू करत देशातील हजारो युवकांना वेदशास्त्रात पारंगत केले. आळंदी, पंढरपूरला धर्मशाळा बांधल्या. सनातन धर्माचा प्रचार-प्रसार करण्याचे काम सारडा परिवाराने केल्याचे पंडित म्हणाले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून संस्थेचे उदार देणगीदार वै. बस्तीरामशेठ सारडा यांची पुण्यतिथी गेल्या आठ वर्षांपासून रक्तदान शिबिर आयोजित करून साजरी करण्यात येत असल्याचे वाघ म्हणाले.
सूत्रसंचलन कांतीलाल राठोड यांनी केले. जनकल्याण रक्तपेढीचे अरुण कुलकर्णी, प्रसाद नातू यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी रक्तदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. देशदूतचे वरिष्ठ उपसंपादक विलास पाटील, वितरण विभागाचे सोमनाथ गडाख, आण्णा जाधव, प्रविण शिंदे, राजहंस माळी, मंगेश जाधव, मयूर गर्दे, स्वप्नील महाले, सतिश गोर्डे, महेश शिंदे, महेंद्र गूरव, भिमा कामी, प्रमोद आंबेकर, टिका जोशी यांच्यासह सारडा विद्यालय व चांडक कन्या विद्यालयाच्या शिक्षकांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
नाशिक महानगरपालिकेला मिळणार लवकरच नवे आयुक्त?
158 दात्यांचे रक्तदान
सकाळपासूनच हवेत प्रचंड गारवा होता. त्यामूळे सुरुवातीला रक्तदात्यांची गर्दी कमी होती. मात्र, त्यांनतर रक्तदात्यांचा वेग वाढला. डॉ. नाईकवाडी फार्मसी कॉलेज व नर्सींग कॉलेजची बसच दुपारी भरुन आली. या कॉलेजच्या जवळपास 45 ते 50 मुला-मुलींनी रक्तदान करत येणार्या सर्वांचाच उत्साह वाढवला. सारडा विद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी आपले व्यवसाय, नोकरी सांभाळून आवर्जून रक्तदान करण्यासाठी आले होते. काही माजी विद्यार्थी गेल्या आठ वर्षांपासून खंड न पडू देता रक्तदान करत असल्याचे या निमित्ताने दिसून आले. माहेश्वरी समाजाच्या अनेक सदस्यांनीही रक्तदान केले. सिन्नर वकील संघाचे काही सदस्य वेळ काढून रक्तदान करुन गेले. ढग्या डोंगर ट्रॅकर ग्रुपचे अनेक सदस्य रक्तदानासाठी आवर्जून आले.
रक्तदात्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येत होते. जवळपास सर्वच रक्तदाते प्रमाणपत्र घेतानाचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढल्यानंतरच शिबिरातून बाहेर पडत होते. रक्तदात्यांसाठी खास एनर्जी ड्रींकची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी चार वाजेपर्यंत 158 दात्यांनी रक्तदान केले होते. हिंदू संस्कृतीत दानाला अधिक महत्व असून यापूढच्या काळात अवयव दान चळवळीचं महत्व नव्या पिढीला करुन देणे गरजेचे असल्याचे संदिप राऊत म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा