नाशिक | Nashik
शिवसेना उबाठा पक्षाचे नाशिकमधील उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत हकालपट्टी करण्यात आली. बडगुजर यांच्यावर शिवसेना पक्षाकडून कारवाई होण्याच्या दोन दिवस आधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये भेट घेतली होती आणि या भेटीनंतर त्यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून कारवाई करण्यात आली. ठाकरे पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार हे निश्चित मानले जात आहे. आज शेकडो कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. मात्र, त्यांच्या गाडीचा ताफा मुंबईत पोहोचण्याआधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज दुपारी १ वाजता मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार आहे, याबाबतची माहिती स्वतः बडगुजर यांनी प्रसार माध्यमांना दिली. पक्षप्रवेश सोहळ्याकरिता निघण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबांनी त्यांचे औक्षण सुद्धा केले. त्यानंतर बसेसमधून आणि काही वाहनांमधून बडगुजर यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले.
पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. अनेक नेते पक्षांतर करत असून त्या पार्श्वभुमीवर सुधाकर बडगुजर यांची पक्षाची शिस्तभंग केल्याच्या कारणातून शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आणि आता भाजप पक्षात जाहीर प्रवेश करणार आहे. सध्या नाशिकसह राज्यात हा मुद्दा प्रचंड गाजत आहे. दरम्या, आज आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह बडगुजर भाजपात पक्ष प्रवेश करणार आहेत. मात्र, त्याआधीच मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती नसल्याचे सांगितले.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा ते म्हणाले की, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. जोपर्यंत स्थानिक टीम असते, पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांच्याशी सल्लामसलत एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. आमच्याकडे बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे. निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाले आहे. त्यामुळे विरोधाची भावना असते. परिणामी नाशिकमध्ये बडगुजर यांच्याविषयी विरोधाची भावना आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बडगुजर यांचे भाजप पक्षात प्रवेश होणार की नाही, यामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




