Saturday, July 27, 2024
Homeनगरउसावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव

उसावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव

बाभळेश्वर |वार्ताहर| Babhaleshwar

ऊस पिकांमध्ये सध्या हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असून वेळीच या किडीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वरच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील लोणी, चंद्रपूर, हसनापूर, सादतपूर, राजुरी, ममदापूर, लोहगाव, बाभळेश्वर, तिसगाव आदी परिसरामध्ये ऊस पिकांमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर आणि पद्मश्री डॉ. विखे कारखाना प्रवरानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सदर गावांमध्ये प्रक्षेत्र भेटी देऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथील पीक संरक्षण विभागाचे प्रमुख भरत दवंगे, कृषी विद्या विभागाचे प्रमुख शैलेश देशमुख, मृद विज्ञान विभागाचे प्रमुख शांताराम सोनवणे आणि पद्मश्री विखे कारखान्याचे ऊस विकास अधिकारी दिलीप पावडे यांनी एकत्रितपणे मोहीम सुरू केली असून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना गटचर्चेद्वारे आणि विविध प्रसार माध्यमांद्वारे माहिती देण्यात येत आहे.

हुमणी अळीचा बंदोबस्त कशाप्रकारे करावा याविषयी पीक संरक्षण विभागाचे प्रमुख भरत दवंगे यांनी सांगितले की, या किडीचा जीवनक्रम मे-जून महिन्यामध्ये पहिला पाऊस पडल्याबरोबर सुरू होतो आणि त्यानंतर या किडीचे भुंगे रात्रीच्या वेळी कडूनिंब, बाभूळ, बोर, चिंच या झाडांवर जमा होतात आणि रात्री झाडाचा पाला खातात. दिवस उगवायच्या आत हे भुंगे पुन्हा जमिनीत जातात आणि यातील मादी अंडी घालण्यास सुरुवात करते. ही मादी एक महिन्यामध्ये 50 ते 60 अंडी घालते आणि त्यातून बाहेर पडलेले अळी जवळपास 6-7 महिने उसाची मुळे कुरतडून खाते. त्यामुळे ऊस वाळतो आणि सहजासहजी उपटून येतो.

या हुमणी अळीचा नियंत्रणासाठी पहिला पाऊस पडल्याबरोबर शेतामध्ये प्रकाश सापळा लावून या किडीची भुंगे प्रथम गोळा करून नष्ट करावेत आणि लगेच शेतामध्ये मेटारायझीयम नावाचे जैविक कीटकनाशक प्रति एकरी 2 लिटर शेतामध्ये ड्रीपद्वारे किंवा पाण्याबरोबर सोडावे. म्हणजेच सुरूवातीलाच लहान अवस्थेतील आल्याचे जैविक पध्दतीने नियंत्रण होईल.

त्याचप्रमाणे रासायनिक किटकनाशकाचा वापर करताना 0.3 टक्के दाणेदार फिप्रोनिल प्रति एकरी 10 किलो किंवा 0.4 टक्के दाणेदार क्लोरॅन ट्रॅनिलीप्रोल प्रति एकरी 8 किलो रासायनिक खतामध्ये मिसळून शेतात टाकावे. मात्र अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असल्यास इमिडॅक्लोप्रिड 40 टक्के अधिक फिप्रोनिल 40 टक्के हे संयुक्त किटकनाशक प्रति एकरी 150 ग्रॅम किंवा 50 टक्के तिव्रेतेचे क्लोरोपायरोफॉस प्रति एकरी 2 लिटर 300 लिटर पाण्यात मिसळून शेतामध्ये ड्रिपद्वारे किंवा पाण्यासोबत सोडावे, असे श्री दवंगे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या