पाथर्डी । तालुका प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे सोमवारी मध्यरात्री उसाने भरलेला एक ट्रक उलटल्याची मोठी दुर्घटना घडली. या अपघातात ट्रकमधील सुमारे २५ टन ऊस रस्त्यावर पसरल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली असून, ऊस मालकाचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक शिरूर कासार येथून पुणे जिल्ह्यातील दौड येथील साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जात होता. सोमवारी रात्री उशिरा तिसगाव परिसरातून प्रवास करत असताना, चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाला (डिव्हाइडर) जाऊन धडकला आणि पलटी झाला.
अपघात इतका भीषण होता की, ट्रकमधील संपूर्ण ऊस महामार्गावर पसरला. रात्रीच्या वेळी याच मार्गावरून इतर वाहनांची वर्दळ सुरू असल्याने रस्त्यावर पडलेला ऊस वाहनांखाली चिरडला गेला, ज्यामुळे ऊस उत्पादकाचे नुकसान झाले. या घटनेमुळे कल्याण-निर्मल महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
तिसगाव हे कल्याण-निर्मल महामार्गावरील महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे अहोरात्र वाहनांची मोठी ये-जा सुरू असते. मात्र, येथील वाढते अतिक्रमण अपघातांना निमंत्रण देत असल्याचे चित्र आहे. विशेषतः गुरुवारी होणाऱ्या आठवडे बाजाराच्या दिवशी विक्रेते थेट रस्त्याच्या कडेला दुकाने लावतात, ज्यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे.
याव्यतिरिक्त, महामार्गालगतच्या अनेक दुकानदारांनी आपले फलक रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे लावले आहेत. हे फलक वाहनचालकांच्या दृष्टीक्षेपात अडथळा ठरत असून अपघातांचे मुख्य कारण बनत आहेत. या वाढत्या धोक्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे.
तिसगाव ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. महामार्गावरील धोकादायक अतिक्रमणे आणि अडथळा ठरणारे फलक तातडीने हटवावेत, जेणेकरून भविष्यातील संभाव्य जीवितहानी आणि अपघात टाळता येतील, असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.




