Sunday, June 23, 2024
Homeनगरमाय-लेकाची विषारी औषध सेवन करून आत्महत्या

माय-लेकाची विषारी औषध सेवन करून आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

कॉफीतून विषारी पदार्थाचे सेवन करून माय-लेकाने जीवन संपविले. सावेडी उपनगरातील तपोवन रोडवर रविवारी ही घटना घडली. रंजना सुरेंद्र गांधी (वय 65) व तिचा मुलगा हिमांशु सुरेंद्र गांधी (वय 35 दोघे रा. तपोवन रोड, नगर) असे मृत झालेल्या माय-लेकाचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान एका बँकेच्या कर्जाला कंटाळून त्यांनी विषारी पदार्थ घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी पहाटे रंजना व हिमांशु यांनी कॉफीमधून विषारी औषधाचे सेवन केले. त्रास होऊ लागल्याने हिमांशु याने 108 नंबरवर फोन करून रूग्णवाहिका बोलून घेतली. रुग्णवाहिकेतून दोघांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान औषध उपचारापूर्वीच रंजनाचा मृत्यू झाला. तर हिमांशुवर उपचार सुरू असताना रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्याचाही मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या खबरीवरून तोफखाना पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयत गांधी यांच्यावर एका बँकेचे कर्ज असल्याचे बोलले जात असून त्याला कंटाळूनच त्यांनी विष प्राशन केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या