Friday, July 5, 2024
Homeमहाराष्ट्रSunetra Pawar : राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब; थोड्याच वेळात भरणार उमेदवारी...

Sunetra Pawar : राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब; थोड्याच वेळात भरणार उमेदवारी अर्ज

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेसाठीही पत्ता कट झाल्याने मंत्री भुजबळ नाराज

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर पोटनिवडणूक (Rajya Sabha By Election) होत आहे. आज या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून कुणाला संधी दिली जाते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज्यसभेच्या जागेसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, यामध्ये सुनेत्रा पवारांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून दुपारी बारा वाजेनंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना पत्र लिहून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेत पाठवण्याची मागणी केली आहे. सुनेत्रा पवार राज्यसभेत गेल्यास बारामतीच नाही, तर पश्चिम महाराष्ट्रात देखील पक्षाला बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता अजित पवार (Ajit Pawar) काय निर्णय घेतात? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुनेत्रा पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेसाठीही पत्ता कट झाल्याने मंत्री भुजबळ नाराज

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. भुजबळ हे राज्यसभेसाठी इच्छुक होते. मात्र, सुनेत्रा पवार यांचे राज्यसभेसाठी नाव निश्चित झाल्याने छगन भुजबळ यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे ते नाराज झाल्याची माहिती मिळत आहे.

पार्थ पवारही राज्यसभेवर जाण्यासाठी होते इच्छुक

राज्यसभेच्या या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ११ ते १२ जण इच्छुक होते. यामध्ये पार्थ पवार यांचाही समावेश होता. पार्थ पवार यांनी देखील कुटुंबातील सदस्य खासदार व्हावा, यासाठी मंगळवारी प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची भेट घेतली होती. पार्थ पवार हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीही इच्छूक असल्याची चर्चा होती. मात्र, तेव्हा संधी न मिळाल्याने ते राज्यसभेवर जाणार का, याबद्दल उत्सुकता होती. मात्र, पक्षाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याने पार्थ पवार यांचा हिरमोड झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या