Saturday, July 27, 2024
Homeनगरएक लाख लोकांनी सूर्यनमस्कारातून केली राष्ट्रवंदना

एक लाख लोकांनी सूर्यनमस्कारातून केली राष्ट्रवंदना

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

वेदांनी संपूर्ण वसुंधरेलाच आपली जननी मानले आहे. परंतु, त्यातही भारतमातेचे विशेष स्थान आहे. जे आपल्या देशाच्या मातीत आहे ते केवळ अद्भूत आहे. विभिन्न प्रकारचे सृष्टीसौंदर्य आणि समृद्धीने नटलेल्या आपल्या देशाला म्हणूनच ‘सोने की चिडिया’ म्हटले गेले आहे. समृद्धीसोबतच आपल्या देशाने निर्माण केलेल्या संस्कृती समोरही अवघं विश्व आपोआपच नतमस्तक होते. आपल्या भूमीतील तक्षशिला, नालंदा सारख्या विश्वविद्यालयांनी ज्ञानाचा आलोक पसरविला आहे. अशा या महान देशाला राष्ट्रवंदना करतांना स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या क्रांतिकारकांचे स्मरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन गीता परिवाराचे संस्थापक तथा श्रीराम जन्मभूमी न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले.

- Advertisement -

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने गीता परिवार, क्रीडा भारती, पतंजली योगपीठ, हार्टफुलनेस इंस्टिट्युट व राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशन या संस्थांनी 75 कोटी सूर्यनमस्कार घालून विश्वविक्रम नोंदविण्याचा संकल्प केला आहे. 1 जानेवारीपासून सुरु झालेल्या या राष्ट्रीय उपक्रमात प्रजासत्ताक दिनी देशभरातील साडेसातशे केंद्रांच्या माध्यमातून एका लाखांहून अधिक जणांनी एकाचवेळी सूर्यनमस्कार घालून अभिनव पद्धतीने राष्ट्रवंदना केली. या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी स्वामीजी बोलत होते. यावेळी योगमहर्षी स्वामी रामदेव महाराज, पतंजली योगपिठाचे केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य, राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनचे अध्यक्ष उदित सेठ, गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, क्रीडा भारतीचे मिलिंद डांगे व हार्टफुलनेस इन्स्टिट्युटच्या श्रीमती एकता बुडैरलिक आदी उपस्थित होते.

स्वामी रामदेव महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना 75 कोटी सूर्यनमस्कारांचा संकल्प स्वप्नवत वाटत असल्याचे सांगितले. मात्र देशभरातील हजारो शाळा, संस्था व व्यक्तिंनी या उपक्रमाशी संलग्न होवून प्रजासत्ताक दिनी त्याचे भव्य आणि दिव्य स्वरुप देशासमोर ठेवल्याचे सांगितले. या संकल्पासाठी देशवासीयांनी दिलेला प्रतिसाद पाहता 20 फेबु्रवारीपर्यंत सुमारे शंभर कोटी सूर्यनमस्कार पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्कर्म करण्यातही सात्त्विक समाधान व स्वगौरव असतो, ज्याला आपल्याकडे स्वाभिमान म्हटले जाते. हा स्वाभिमान आज आपण प्राप्त केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पतंजली योगपीठाचे केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य, राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनचे अध्यक्ष उदित सेठ व हार्टफुलनेस इन्स्टिट्युटच्या श्रीमती एकता बुडैरलिक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि 75 कोटी सूर्यनमस्कार उपक्रमाचे प्रकल्प संयोजक डॉ. संजय मालपाणी यांनी यावेळी देशभरातील 30 हजार शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांसह या उपक्रमात एकूण 45 लाख 64 हजार 611 योगप्रेमी सहभागी झाले असून त्यांच्याकडून दररोज प्रत्येकी 13 सूर्यनमस्कार या प्रमाणे आत्तापर्यंत 65 कोटी 11 लाख 4 हजार 506 सूर्यनमस्कार घातले गेल्याची माहिती दिली व येत्या काही दिवसांतच हा संकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता जाधव, गिरीश डागा, मिहिर जाधव, निलेश पठाडे, क्षीतिज महापात्र, सचिन जोशी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

सुमारे एक लाखांहून अधिक जणांच्या ऑनलाईन सहभागासह या उपक्रमात युट्युब व फेसबुकच्या माध्यमातून एक कोटीहून अधिक लोक जोडले गेले होते. या देखण्या कार्यक्रमाचा शुभारंभ संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रणव पतवारी यांनी लिहिलेल्या व भूषण देशमुख यांनी संगीतबद्ध केलेल्या सूर्यनमस्कार हम करें, शक्ति-साधना का प्रण करें’ या गीतावर योगवंदना सादर करीत केले. नृत्यदिग्दर्शक म्हणून सोनाली महापात्रा यांनी तर प्रशिक्षक म्हणून मंगेश खोपकर यांनी आपली भूमिका बजावली.

- Advertisment -

ताज्या बातम्या