पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
नवीन म्हसणे फाटा सुपा औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये काम चालू ठेवण्यासाठी पाच लाखांची खंडणी द्या, नाहीतर हातपाय तोडण्याची धमकी आरोपी राजु पाचारणे यांनी कंपनी कामगारांना दिली आहे. याबाबत अंजली दत्तान्य येवले (रा. वडझिरे, ता. पारनेर, हल्ली रा. मोशी, पुणे) यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, प्रीव्हिलेज एनरजेक्स प्रा. लि., पळवे बुद्रुक शिवार, ता. पारनेर येथे फायर फायटर सिस्टीमचे काम करत असताना आरोपी राजु पाचारणे (रा. पळवे खुर्द) यांनी शिवीगाळ करून धमकी देऊन म्हटले की, कंपनीत काम चालू करायचे असेल तर माझी परवानगी घ्यायची. जर काम चालू केले तर तुमचे कुर्हाडीने हातपाय तोडून सर्वांना जिवे ठार मारू अशी धमकी दिली.
त्यावर फिर्यादी व तेथील कामगार सहकारीनी त्यास समजावून सांगत असताना तो फिर्यादीस म्हणाला की, तुला काम करायचे असेल तर मला पाच लाख रुपयेची खंडणी द्यावी लागेल, तरच तुझे काम चालू कर; नाहीतर काम बंद ठेव, असे म्हणून त्याने कंपनीतील चाललेले काम बंद पाडले. आणि मी कोणालाही घाबरत नाही. तुला पाच लाख रुपये द्यावेच लागतील, नाहीतर तुला काय करायचे ते कर असे म्हणत आरोपी तेथून निघून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कुटे करत आहेत.




