मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. मात्र, सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना या शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या निर्णयावर भाष्य करताना सुप्रिया सुळे अत्यंत भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, “अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत जे काही निर्णय घेतले, ते त्यांच्यासोबतच गेले आहेत. आता माझा भाऊच या जगात नाही, त्यामुळे दोन गट एकत्र येण्याच्या किंवा विलीनीकरणाच्या चर्चांना आता काहीही अर्थ उरत नाही.” अशा शब्दांत त्यांनी दोन्ही गट एकत्र येण्याच्या शक्यतांना पूर्णविराम दिला.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील गाजलेल्या मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटवरही आपली भूमिका मांडली. विकास खारगे समितीने या प्रकरणात पार्थ पवार यांना अभय दिल्याचे वृत्त समोर आले आहे. यावर विचारले असता सुळे म्हणाल्या की, “महसूल विभागाचा संबंधित अहवाल अद्याप अधिकृतपणे सार्वजनिक झालेला नाही. जोपर्यंत मी तो अहवाल प्रत्यक्ष वाचत नाही, तोपर्यंत केवळ सूत्रांच्या हवाल्याने सुरू असलेल्या बातम्यांवर भाष्य करणे एका लोकप्रतिनिधी म्हणून मला योग्य वाटत नाही.”
पार्थ पवारांवरील आरोपांबाबत बोलताना त्यांनी कौटुंबिक विश्वासाचा दाखला दिला. “जेव्हा हे प्रकरण पहिल्यांदा समोर आले आणि त्यात पार्थचे नाव घेतले गेले, तेव्हा मी स्वतः पुतण्या म्हणून त्याला फोन करून विचारणा केली होती. त्यावेळी पार्थने मला अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले होते की, ‘आत्या, मी काहीही चुकीचे केलेले नाही.’ माझ्या पुतण्याच्या त्या शब्दावर माझा पूर्ण विश्वास आहे,” असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.





