नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून इंडिया आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित होते. तत्पूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील नेत्यांना जेवणाचे निमंत्रण होते. या निमंत्रणानुसार उद्धव ठाकरे सहकुटुंब राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचले होते. मात्र, येथील बैठकीत उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवल्याने सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान या सर्व मुद्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार, सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून उद्धव ठाकरेंवर होणारी टीका हास्यास्पद आहे असे त्या म्हणाल्या.
राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातील प्रेझेंटेशन दिले. यादरम्यानचे काही फोटोही समोर आले आहेत. या फोटोमध्ये उद्धव ठाकरेंसह संजय राऊत, आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसत आहे. त्यामुळे, शिवसेना शिंदे गट आणि भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. त्यावर, आता सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
उद्धव ठाकरे यांच्यावर जी टीका होत आहे ती अतिशय हास्यास्पद आहे,अतिशय बालिश आरोप आहेत. ते एक इनफॉर्मल गेट टूगेदर होते, कोणीही कुठे बसले होते. अखिलेश यादव दुसऱ्या रांगेत होते, प्रोफेसर पहिल्या रोमध्ये होते. आदरणीय पवार साहेब हे तिसऱ्या की चौथ्या रांगेत होते. बसण्याची अशी काही ठराविक सिस्टीम नव्हती तिथे. तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता. आम्हाला सहकुटुंब , एकत्र जेवण्यासाठी तिथे बोलावले होते. तो काही सरकारी कार्यक्रम नव्हता. मला विचाराल तर उद्धवजी हे सगळ्यात चांगल्या सीटवर बसले होते, कारण ते स्क्रीनपासून अंतर ठेवून बरोब्बर मधली सीट त्यांची होती. ते सगळ्यात चांगल्या जागी होते, कारण त्यांना व्यवस्थित ती स्क्रीन दिसत होती, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा अतिशय बालिश असल्याचा पुनरुच्चार केला.
निवडणूक आयोग स्वायत्त आहे, तर मग भाजप का पर्सनल घेत आहे?
दरम्यान, काल राहुल गांधीनी मतांच्या चोरीचा आरोप करत निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. मात्र त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधीवर टीका करत त्यांना प्रत्युत्तर दिले. यावरूनच आता सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला.
निवडणूक आयोग स्वायत्त आहे, तर मग भाजप का पर्सनल घेत आहे ? राहूल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केलेत, मग भाजप का उत्तर देतेय असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
वैयक्तिक आयुष्यात काय करतात? त्याच्याशी पक्षाचा काही संबंध नाही
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आपल्याकडे गोपनीयतेच्या अधिकाराचा कायदा आहे. तसेच हा कायदा संसद आणि सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. ज्यावेळी एखाद्या आरोपीचा मोबाईल घेतला जातो तेव्हा तो फक्त पोलिसांकडून न्यायालयाला दाखवला जातो. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीला तो मोबाईल दाखवला जात नाही. त्यामुळे मोबाईलमधला डेटा बाहेर लीक केल्यास तो गुन्हा असल्याचे हे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे आमच्या पक्षातील जे कोणी सदस्य असतील त्यांची जबाबदारी माझीच आहे. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आमचीच आहे. पण, सदानंद सुळे यांनी काही सरकारमध्ये गडबड केली, तर ती माझी जबाबदारी आहे. पण, वैयक्तिक आयुष्यात काय करतात? त्याच्याशी पक्षाचा काही संबंध नाही,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “मोबाईल न्यायालयात दाखवण्याचा अधिकार फक्त पोलीस यंत्रणेला आहे. त्यामुळे गैरवापर होत असेल तर हे दुर्दैवी आहे,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच यावेळी त्यांना रुपाली चाकणकर यांच्यावर तुम्ही कारवाईची मागणी करणार आहात का? अशी विचारले असता त्या म्हणाल्या की, “ते सरकारने ठरवावे आणि या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायद्याचे जाणकार आहेत आणि कर्तुत्वान आहेत. मुख्यमंत्र्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे,” असे म्हणत खोचक टोला त्यांनी लगावला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




