नवी दिल्ली –
अभिनेता सुशांतसिंह राजपूतची हत्या की आत्महत्या? याचा खुलासा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. कारण, एम्स आपला वैद्यकीय अहवाल आणि
त्यावरील मत पुढील आठवड्यात सीबीआयकडे मांडणार आहे. एम्सचे फॉरेन्सिक विभागप्रमुख आणि सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या मेडिकल बोर्डचे अध्यक्ष डॉ. सुधीर गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.
ते म्हणाले, सुशांतसिंह मृत्यू प्रकरणातील मेडिकल बोर्डचं मत पुढील हप्त्यात सीबीआयकडे सोपवण्यात येईल. मला आशा आहे की, कोणत्याही संशयाविना हे निर्णायक असेल. सध्या हे प्रकरण कोर्टात असल्याने यासंबंधित अहवाल सार्वजनिक करता येणार नाही.
सात सप्टेंबर रोजी एम्सच्या पाच सदस्यीय फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) तज्ज्ञांचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाला सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील फाईल्स पाहण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. या पथकाला विसेराच्या माध्यमातून सुशांतला विष दिल्याच्या शक्यतेचा तपास करण्याचे काम सोपवण्यात आले. सीबीआयने या प्रकरणी एम्सची मदत मागितली होती.
व्हिसेरा रिपोर्टमधून उलगडणार सुशांतच्या मृत्यूचं गुढ
सुशांतला विष देण्यात आलं होतं किंवा नाही हे व्हिसेरा रिपोर्टमधून स्पष्ट होईल. हा रिपोर्ट सुशांतच्या 20 टक्के व्हिसेराच्या तपासणीतून बनवण्यात आला आहे. सुशांतच्या 80 टक्के व्हिसेरा मुंबई पोलिसांनी आपल्या तपासासाठी वापरला होता. सुशांतच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की, त्याने आत्महत्या केलेली नाही तर त्याची हत्या करण्यात आली आहे. त्याच्या कुटुंबियांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला हीला या प्रकरणात मुख्य आरोपी केलं आहे.
व्हिसेरा रिपोर्ट मिळाल्यानंतर रविवारी एम्सच्या डॉक्टरांचे पॅनेल या प्रकरणी अंतिम बैठक घेणार आहे. या बैठकीत सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टवर चर्चा होईल. त्यानंतर एम्सचे डॉक्टरचं सुशांतच्या मृत्यू प्रकरणावर अंतिम रिपोर्ट देतील.