मुंबई – Mumbai
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आता सीबीआयकडे गेलं आहे. शिवाय ईडीही आता त्याच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करत आहे. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्तीविरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात अंमलबजावणी संचानालय (ईडी) चौकशी करत आहे.
ईडी सुशांतच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. त्यांनी केलेल्या तपासात सुशांत आर्थिक विवंचनेत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुशांतचं वार्षिक उत्पन्न ३० ते ३५ कोटी रुपये होतं.
ईडीने सुशांतच्या सर्व बँक खात्यांची चौकशी सुरु केली आहे. रिया आणि सुशांतदरम्यान १५ कोटींचे कसे व्यवहार झाले तेही तपासणं सुरु आहे. त्या तपासात सुशांतच्या बँक खात्याची माहिती मिळाली आहे. सुशांतने कुठे कुठे कशी गुंतवणूक केली होती, त्यासाठी सुशांतचे सीए संदीप श्रीधर यांनाही चौकशीसाठी पुन्हा बोलावलं जाण्याची शक्यता आहे.
१४ जूनला सुशांतने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं होतं. परंतु ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा सूर बळकट होऊ लागला. मुंबई पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण उपस्थित करण्यात आलं. त्यानंतर दोन महिन्यानंतर आता हा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे.