अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शासनाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पारनेर नगरपंचायत मुख्याधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी विजय सदाशिव औटी याचा नगरच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात आलिशान मुक्काम सुरू असल्याचा प्रकार बुधवारी रात्री उशिरा काँग्रेसचे नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भांडाफोड करीत उजेडात आणला. त्याचा शाही बडदास्त सुरू असल्याची माहिती समजताच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह यावेळी त्यांनी थेट रूग्णालय गाठले. कार्यकर्त्यांसह काळे दाखल झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह रूग्णालयाच्या सीएमओ यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला.
याची कुणकुण लागतातच ड्युटीवर असणार्या पोलिसांनी खासगी वाहनाची व्यवस्था करत अवघ्या दहा मिनिटांत औटीला मागच्या दाराने वाहनात बसून रूग्णालयातून नेले. या सर्व प्रकरणाबाबतच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने काल, बुधवारी दुपारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या दालनात आंदोलन करण्यात आले. यावेळी काळे यांच्यासह अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, संभाजी कदम, प्रकाश पोटे, संजय झिंजे आदी उपस्थित होते. दरम्यान, यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांकडून तात्काळ कारवाई केली असून त्यांनी पारनेर कारागृह अधीक्षकांना पत्र पाठविले आहे. 3 ऑगस्ट रोजी आपल्या कारागृहातील बंदी विजय औटी हा पारनेर ग्रामीण रूग्णालयाच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला होता.
त्याला 6 ऑगस्ट रोजी सकाळी 8.50 वा. डिस्चार्ज देण्यात आला. परंतु रात्री 08.15 पर्यंत बंदिस पारनेर कारागृह येथे स्थलांतरित करण्यात आले नाही. ही बाब गंभीर असून याबाबत आपण पुढील कार्यवाही करावी असे पत्रात म्हटले आहे. आंदोलकांनी सिव्हील मधील सीसीटीव्ही फुटेजची मागणी लेखी अर्जद्वारे केली होती. फुटेज उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले आहे. लेखी आश्वासन नंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, अॅड. राहुल झावरे यांच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी औटीसह प्रीतेश पानमंद, मंगेश कावरे यांचे जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने नामंजूर केले आहे.