लासलगाव | वार्ताहर Lasalgaon
४० दिवसात दाम दुप्पटीच्या आमिषाने गुंतवणूकदाराना कोट्यवधींचा गंडा घालून फसवणूक करणारा संशयित सतिश पोपट काळे याला धाराशिव पोलिसांकडून लासलगाव पोलीसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरा निफाड पोलीस ठाणे कोठडीत ठेवण्यात आले आहे. तर दुसरा संशयित आरोपी योगेश काळे याचा पोलीस पथक शोध घेत आहे अशी माहिती निफाड पोलीस उपअधीक्षक डॉ. निलेश पालवे यांनी दिली.
पोलीस उपअधीक्षक डॉ. पालवे हे लासलगाव पोलीस ठाण्यात तळ ठोकून असून त्यांनी निफाडचे पोलीस निरीक्षक गुरव , सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्यासह आज सकाळपासून लासलगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपींच्या रेल्वे स्टेशन रोडवरील इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड या कार्यालयातून तपासासाठी घेतलेले महत्वाचे कागदपत्राच्या आधारावरून गुंतवणूकदार व एजंट म्हणून प्रवृत्त करणाऱ्या इसमांची यादी सापडली अशा 35 ते 40 जणांना पोलीस कार्यालयात बोलावून त्यांचे जबाब नोंदविले असून संशयित आरोपी कसा रॅकेट चालवत होते याविषयी चौकशी केली . तसेच इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड या नावाच्या कंपनीचे बँकेतील खाते गोठविली असून या खात्यावर झालेल्या व्यवहाराची पडताळणी केली आहे.
संशयित सतीश काळे यांच्या टाकळी विंचूर येथील निवासस्थानाची तर कंपनीचे व्यवस्थापक म्हणून कामकाज बघणाऱ्या अनिता शिंदे यांच्यासह कर्मचारी वर्गाच्या घराची तपासणी करण्यात आली . दरम्यान संशयित योगेश काळे यांच्या शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब हंडाळ यांच्या पथकाने दोन दिवस आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तो ठिकाण बदलत असल्याने त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही. त्याचा पोलीस कसून शोध घेत आहे.त्याच्याकडे पासपोर्ट असल्याने तो परदेशात पळून जाऊ नये म्हणून लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
दुप्पटीचे आमिषला बळी पडलेले गुंतवणूकदारांनी पोलीस तपास व प्रक्रियेबद्दल घाबरून जाऊ नये तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पोलीस उपअधीक्षक डॉ. पालवे यांनी केले आहे.