नवी दिल्ली – New Delhi
आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जचे (सीएसके) 12 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आयपीएलचे वेळापत्रक लांबणीवर पडले आहे…
शनिवारी आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा होणार होती. नियमानुसार, पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूला 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यानंतर तो प्रशिक्षणात परत येऊ शकतो. क्वारंटाइन कालावधीनंतर, जैव सुरक्षित वातावरणात जाण्यासाठी त्याची पुन्हा चाचणी केली जाईल.
21 ऑॅगस्ट रोजी चेन्नई सुपर किंग्ज टीम दुबईत दाखल झाली होती. यानंतर त्यांनी 6 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला. 28 ऑॅगस्टपासून सीएसकेचा संघ दुबईमध्ये प्रशिक्षण सुरू करणार होता. मात्र, कोराना पॉझिटिव्ह प्रकरणांमुळे त्यांचा क्वारंटाइन कालावधी वाढवण्यात आला आहे. या घटनेमुळे आयपीएलच्या आयोजनात कोणतीही अडचण येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा आयपीएलचे तेरावे पर्व 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत यूएईत रंगणार आहे.
यूएईमध्ये जाण्यापूर्वी सीएसकेने चेन्नई येथे पाच दिवसांचे प्रशिक्षण ठेवले होते. यामध्ये एम.एस.धोनी, सुरेश रैना, दीपक चहर, अंबाती रायडू, पीयूष चावला आणि शार्दुल ठाकूर यांनी सहभाग घेतला होता. दुबईला दाखल झालेल्या इतर टीमच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्ज अद्यापही प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहे.