बार्बडाॅस । Barbados
आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेमध्ये २० जून २०२४ रोजी केंसिंगटन ओव्हल ब्रीज टाऊन बार्बाडोस स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८:०० वाजता खेळविण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे असणार आहे. तर अष्टपैलू राशीद खानकडे अफगाणिस्तान संघाची धुरा असणार आहे.
विशेष म्हणजे भारतीय संघ यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये प्रथमच वेस्ट इंडिजमध्ये खेळणार आहे. त्यामुळे फलंदाजांवर सहाजिकच थोडे दडपण असणार आहे. वेस्ट इंडिज येथील खेळपट्टी अमेरिकेतील खेळपट्टीच्या तुलनेने संथ असल्याने या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांचा कस लागणार आहे. आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. युगांडा आणि पपुआ न्यू गिनिया विरूध्द विजय संपादन करून अफगाणिस्तान सुपर ८ मध्ये दाखल झाला आहे.
अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंड संघाविरुद्ध विजय संपादन करून वर्ल्डकप स्पर्धेमध्ये मोठा उलटफेर केला आहे. त्यामुळे जायंट किलर म्हणून क्रिकेट विश्वात लोकप्रिय असलेला अफगाणिस्तान भारतीय क्रिकेट संघाला पराभूत करून धक्कादायक निकाल नोंदवण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला थोडा सावध खेळ करावा लागणार आहे.
मात्र या महत्वपूर्ण लढतींना प्रारंभ होण्यापूर्वी अफगाणिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फिरकी गोलंदाज मुजीबुर रहेमान बोटाच्या दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. बदली खेळाडू म्हणून हजरतुलला झझाईची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका संघाविरुद्ध विजय संपादन करून सुपर ८ मध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे.
२०१० मध्ये दोन्ही संघामध्ये प्रथम टी २० सामना खेळविण्यात आला होता. या सामन्यात भारताने एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली ७ गडी राखून विजय संपादन केला होता. तसेच टी २० वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारतात झालेल्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेत भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात ३-० ने मालिका विजय संपादन केला होता.
अफगाणिस्तान संघाला अद्याप आपल्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने अफगाणिस्तान विरुध्द ५ सामने खेळले असून, २०१ धावा केल्या आहेत. तसेच कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तान विरुध्द भारतात झालेल्या टी २० मालिकेतील बंगळूरु येथील सामन्यात शानदार १२१ धावांची खेळी साकारली होती.
या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १८० असून दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या १६० इतकी आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय कर्णधार घेण्याची शक्यता आहे. आजवर झालेल्या ४५ टी २० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संघाने २९ तर धावांचा पाठलाग करताना संघाने १३ सामन्यात विजय संपादन केला आहे. दुसऱ्या डावात ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजी करता अनुकूल राहिली आहे.
या खेळाडूंवर असेल विशेष नजर
रोहित शर्मा
विराट कोहली
रहेमनुलला गुरबाझ
सलिल परांजपे, नाशिक