टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान गावच्या विकासाला हातभार लावण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून नागरी जन सुविधा निधीतून टाकळीभानला 14 हायमॅक्स पथदिवे मिळाले आहेत. मात्र स्थानिक गावपुढार्यांच्या गटातटाच्या राजकारणामुळे हे पथदिवे परतीच्या मार्गावर आहेत.
खा. सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून नागरी जनसुविधा निधी अंतर्गत 14 हायमॅक्स पथदिवे मंजूर होऊन गावात पोहच झाले आहेत. मात्र हे पथदिवे कोणत्या ठिकाणी लावायचे या श्रेय वादावरुन गावपुढार्यांमध्ये मतभेद झाले आहेत. ग्रामपंचायतीचा एक गट गेल्या महिन्यात खा. लोखंडे यांना भेटून जलजीवन मिशन योजनेसाठी वाढीव प्रस्ताव करुन मोठा निधी मिळावा व सुशोभिकरणासाठी भरीव निधी मिळावा या मागणीसाठी भेटला होता व तसे निवेदन दिले होते.
शुक्रवारी 14 हायमॅक्स पथदिवे घेऊन गाडी टाकळीभान येथे दाखल होताच मुरकुटे गटाच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गावर हे पथदिवे बसवणार आसल्याचा संदेश सोशल मिडीयावर टाकला. मात्र आम्ही सरकार पक्षाचे कार्यकर्ते असतानाही याबाबत आम्हांला माहिती देण्यात आली नाही व परस्पर पथदिव्यांची विल्हेवाट लावली जात असल्याचे लक्षात येताच भाजपा व सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. थेट खा. लोखंडे यांच्याशी चर्चा केली. मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी एकत्र बेठक घेऊन योग्य ठिकाणी पथदिवे बसवावेत असा सल्ला दिल्याने भाजपा सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाडगाव रोड, सांस्कृतिक भवन रोड, लक्ष्मीवाडी व दलीत वस्ती स्मशानभुमीत हे पथदिवे बसवण्याचा निर्णय घेतला.
या दोन्ही गटाच्या वादात ठेकेदार कंपनीने पथदिवे बसवण्याची केलेली तयारी रखडली. अखेर ठेकेदाराने येथून गाशा गुंडाळण्याचा प्रयत्न केला. येथे ठेवलेले साहित्य दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी गाडीही पाठवली. मात्र भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्याने ठेकेदाराने निम्मे साहित्य जागेवर ठेवले तर निम्मे महत्वाचे साहित्य मालवाहु गाडीत भरुन घेऊन गेला आहे. गटातटाच्या राजकारणात विकास योजनांनाही खिळ घालण्याचे प्रकार येथे यापूर्वीही घडलेले आहेत. त्यामुळे गटातटाच्या राजकारणाचा फटका पथदिव्यांना बसून पथदिवे परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा आता रंगली आहे.