टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्या सेवानिवृत्तीस काही दिवस बाकी असतानाच जिल्हापरिषदेचे मुख्य अधिकारी यांना ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन ग्रामविकास अधिकार्याचे निलंबन केले आहे. जिल्हापरिषद मुख्य अधिकारी यांनी ही प्रशासकीय कारवाई केल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांत खळबळ उडाली असून तक्रारदार ग्रामस्थांना न्याय मिळाला आहे.
टाकळीमिया ग्रामपंचायतीमध्ये भाऊसाहेब गंगाधर निमसे हे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यांच्या काळात त्यांच्यावर ग्रामस्थांचे अनेक आरोप झालेले आहेत. संबंधित ग्रामविकास अधिकारी यांनी आपला काळा कारभार लपवण्यासाठी ग्रामस्थांच्या खोट्या सह्या दाखवून काही ग्रामपंचायत पदाधिकार्यांच्या संगनमताने उपस्थित नसलेल्या इतर सदस्यांच्या खोट्या स्वाक्षरी दाखवून बोगस ग्रामसभा दाखवण्याचा प्रताप केला होता. परंतु, गावातील जागरूक ग्रामस्थ ज्येष्ठ विधीज्ञ अॅड रावसाहेब करपे, नंदकुमार जुंदरे, प्रताप जाधव, गणेश तोडमल यांनी हा विषय दोन ते तीन ग्रामसभेतून ग्रामस्थांसमोर आणला होता. सभेत ग्रामविकास अधिकारी यांच्या निलंबनाचा ठराव केला होता. त्याबाबत राहुरी पंचायत समितीचे मुख्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.
परंतु त्यांनी दखल दिली नाही म्हणून थेट जिल्हा परिषद मुख्य अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे या ग्रामस्थांनी तक्रार दिली. मुख्याधिकारी अशिष येरकर यांनी सदर तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले व सदर चौकशीत सदर ग्रामविकास अधिकार्यांने खोट्या सह्या दाखवून बोगस ग्रामविकास घेतल्याचे निष्पन्न झाले. संबंधित चौकशी अहवाला नुसार सदर ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब गंगाधर निमसे यांनी कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेवून जिल्हापरिषद जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम 1967 अंतर्गत निलंबन करण्यात आले. या कारवाईमुळे यात दोषी असणार्यां ग्रामपंचायत पदाधिकार्यांवर प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार असून या कारवाईने गावच्या विकासामध्ये असलेले सर्वश्रेष्ठ अधिकार ग्रामस्थांकडून कोणीही अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी हिरावून घेऊ शकत नाही हे सिद्ध झाले आहे.