Tuesday, October 22, 2024
Homeनाशिकफलोत्पादन योजनांचा लाभ घ्या : पालकमंत्री भुसे

फलोत्पादन योजनांचा लाभ घ्या : पालकमंत्री भुसे

जिल्हास्तरीय डाळिंब व कांदा पीक परिसंवाद

- Advertisement -

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

डाळिंब व कांदासारख्या पिकांमुळे शेतकर्‍यांची प्रगती होत आहे. मात्र डाळिंबावरील करपा, तेलगट डाग, फुल गळ सारख्या विविध रोगांमुळे हे पीक अडचणीत येत असल्याने त्याचा फटका उत्पादकांना सहन करावा लागतो. यावर उपाययोजना होण्याच्या दृष्टिकोनातून तज्ञांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन व्हावे यासाठी डाळिंब व कांदा पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. फलोत्पादन वाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा उत्पादकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे बोलतांना केले.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कृषी विभाग व आत्मा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बालाजी लॉन्स येथे आयोजित जिल्हास्तरीय डाळिंब व कांदा पिक परिसंवादाचे उद्घाटन फलोत्पादन मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. विभागीय कृषि सहसंचालक रविशंकर चलवदे, कृषि जिल्हा अधिक्षक शिवाजीराव आमले, आत्मा प्रकल्प संचालक सुनिल वानखेडे, कृषि विज्ञान संकुल प्राचार्य सचिन नांदगुडे, डाळिंबरत्न बाबासाहेब गोरे, उपविभागीय कृषि अधिकारी गोकुळ अहिरे, तहसीलदार विशाल सोनवणे, तालुका कृषि अधिकारी भगवान गोर्डे, अनिल निकम आदी अधिकारी व शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलोत्पादन क्षेत्र व उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात विविध प्रकल्प व योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून फलोत्पादन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करून कृषि व्यवसायाला चालना दिली जाणार असल्याची माहिती देत पालकमंत्री भुसे पुढे म्हणाले, ड्रोन या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमीतकमी वेळेत शास्त्रीय पध्दतीने पिकांवर फवारणी केल्यामुळे वेळेबरोबर आर्थिक बचत देखील होणार आहे. फळबाग लागवड, कांदा चाळ आदी विविध योजना कृषि विभागामार्फत राबविल्या जात आहे. या योजनांचा लाभ घेत शेतकर्‍यांनी स्वत:चा उत्कर्ष साधावा असे आवाहन केले.

नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या योजनेमुळे सुरगाणा, कळवण, देवळा व मालेगाव तालुक्यातील 32 हजार 492 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. गिरणा उजवा व डाव्या कालव्याची क्षमता देखील वाढविण्याबरोबर पाटचार्‍या दुरूस्त केल्या जातील. बंदिस्त कालव्याच्या माध्यमातून जास्तीतजास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती भुसे यांनी शेवटी बोलतांना दिली.
या परिसंवादात मार्गदर्शन करतांना डाळींब रत्न गोरे यांनी जमीनीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म शेतकर्‍यांनी ओळखण्याची गरज व्यक्त केली. वेळोवेळी माती परीक्षण करून घेण्यासह अन्न द्रव्य व्यवस्थापन, बहार व पाणी नियोजनातील त्रुटीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. रासायनिक खतांपेक्षा सेंद्रीय व जैविक खतांचा वापर शेतकर्‍यांनी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी कृषी सहसंचालक रविशंकर चलवदे, जिल्हा कृषि अधिकारी शिवाजी आमले आदींनी मनोगत व्यक्त केले. पालकमंत्री भुसे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना पुर्वसंमती पत्र व मंजुरी पत्राचे वाटप केले गेले. गोकुळ अहिरे यांनी प्रास्ताविक तर तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांनी आभार मानले.

मंजुरी पत्राचे वाटप
ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या व राज्यस्तरावर लॉटरीव्दारे निवड झालेल्या तुकाराम सुर्यवंशी, सुनिल पवार, गंगुबाई अहिरे, राजेंद्र गेंद, ललित पगार, दत्तात्रेय निकम, रविंद्र पवार, लक्ष्मण पवार, राकेश इंगळे, सुनंदा महाले, भास्कर झगडे, अशोक आहेर, अमृत भामरे या शेतकर्‍यांना फुंडकर फळबाग लागवड योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत मंजुरी पत्राचे वाटप पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते यावेळी केले गेले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या