तामिळनाडू | Tamil Nadu
अभिनेत्री त्रिशाचा उल्लेख करत केलेल्या कथित वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्यामुळे तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्या विरोधी पक्षनेते असलेले उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी तमिळनाडू पोलिसांनी उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना चौकशीसाठी चेन्नईहून तंजावर येथे नेले जाणार असल्याचे सांगितले जाते. स्टॅलिन यांनी अंतरिम जामीन मिळवण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर दुपारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या मुद्द्यावर तंजावूर येथे झालेल्या आंदोलनात उदयनिधी स्टॅलिन भाषण करत होते. भाषणादरम्यान काही कार्यकर्त्यांनी अभिनेत्री त्रिशाचे नाव घोषणांमधून घेतले. त्यानंतर उदयनिधी यांनी केलेल्या एका वक्तव्याचा अर्थ अभिनेत्रीबाबत आक्षेपार्ह आणि दुहेरी अर्थाचा असल्याचा आरोप करण्यात आला. या वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला.
Liquor Brands Banned: भारतातील ‘या’ पाच मद्यांच्या ब्रँड्सवर अचानक बंदी; कारण वाचून बसेल धक्का
पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला. महिलांचा अवमान केल्याचा तसेच संबंधित कायद्यांतील विविध कलमांखाली कारवाईची मागणी करण्यात आली. काही संघटनांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली.
अटक आणि राजकीय आरोप
एफआयआरनंतर चेन्नई पोलिसांनी उदयनिधी स्टॅलिन यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत काही डीएमके कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली. या कारवाईवर डीएमकेने तीव्र आक्षेप घेत, ही राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई असल्याचा आरोप केला आहे.
उदयनिधी यांचे स्पष्टीकरण
वाद वाढल्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचा दावा केला. आपण अभिनेत्री त्रिशाबद्दल नव्हे, तर कावेरीच्या पाण्याबाबत बोलत होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र विरोधी पक्षांनी हे स्पष्टीकरण फेटाळून कारवाईची मागणी कायम ठेवली.
राजकीय वातावरण तापले
या घटनेनंतर तामिळनाडूत विविध पक्षांकडून निदर्शने करण्यात आली. काही संघटनांनी महिलांचा सन्मान राखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी केली, तर डीएमकेने हा विरोधकांचा राजकीय डाव असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणामुळे तामिळनाडूच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे.




