Friday, November 22, 2024
Homeनगरतामिळनाडूतून आलेला फटाक्यांचा ट्रक नगरजवळ पकडला

तामिळनाडूतून आलेला फटाक्यांचा ट्रक नगरजवळ पकडला

अडीच लाखांचे फटाके जप्त || चौघांविरूध्द पोलिसांत गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

फटाके मागविणे, बाळगणे किंवा विक्री करण्याचा परवाना नसतानाही तामिळनाडू येथून नगरच्या दोघांनी ट्रकभर फटाके मागितले. दरम्यान, सदर ट्रक नगर तालुका पोलिसांनी कारवाई करून अरणगाव चौक शिवारात पकडला. या प्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार विजय साठे यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

पुन्नुस्वामी सी चिन्नुपिल्ले (वय 43), भोवनेश्वर आण्णादुराई (वय 22, दोघे रा. विरा कोंडणपट्टी, ता. कड्युर, जि. करूर, तामिळनाडू), किरण संजय खामकर व अमोल संभाजी जाधव (दोघे रा. एमआयडीसी, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून 10 लाखाचा ट्रक, दोन लाख 43 हजार 524 रूपयांचे फटाके असा 12 लाख 43 हजार 524 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ट्रकमध्ये कसल्याही प्रकारे आग विझविण्याचे किंवा सेफ्टी साहित्य न ठेवता फटक्यांची वाहतुक केली जात असल्याचा एक संशयित ट्रक तालुका पोलिसांनी मंगळवारी (20 ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास अरणगाव चौक येथे पकडला.

या ट्रकमधील पुन्नुस्वामी सी चिन्नुपिल्ले व भोवनेश्वर आण्णादुराई यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता सदरचे फटाके किरण संजय खामकर व अमोल संभाजी जाधव यांनी मागितले असल्याचे समोर आले. खामकर व जाधव यांच्याकडे फटाके मागविण्याचा, बाळगण्याचा किंवा विक्री करण्याचा परवाना नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करून ट्रक व त्यातील फटाके जप्त केले आहेत.सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस अंमलदार खरात करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या