अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar
साडेतीन कोटी रुपये खर्च करून झालेल्या तपोवन रस्त्यावरून नगर शहराचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेने केलेल्या आरोपाला राष्ट्रवादीने गुरुवारी प्रत्युत्तर दिले. आ. संग्राम जगताप यांनीच निधी आणला. त्यांनीच निकृष्ट कामाची तक्रार केली. शिवसेनेने केवळ आडकाठी आणण्याचे काम केले. 25 वर्षांत त्यांनी एकदा तरी तपोवन रोडवर डांबर टाकले का? असा सवाल करत मनपाचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
तपोवन रोडचे काम होऊ नये म्हणून माजी आमदारांनी विरोध केला होता. आ. जगताप यांनी मुख्यमंत्री निधीतून या रोडसाठी निधी मंजूर करून आणला. जेव्हा रस्ता खराब झाला त्यावेळी सर्वप्रथम स्थानिक नगरसेवकांनी तक्रार केली. आ. जगताप यांनी तर थेट ग्रामविकास मंत्र्यांकडे तकार केली. त्यामुळे या कामाची तपसणी सुरू आहे.
लोकप्रतिनिधींनी कामे मंजूर करून आणयाची असतात. मात्र, काम कसे सुरू आहेत, त्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची नसते, असा टोला मनपा विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर यांनी विरोधी शिवसेनेच्या नेत्यांना लगावला. दरम्यान माजी आमदारांनी 25 वर्षांत एकदा तरी त्या रस्त्यावर डांबर टाकले का असा सवाल देखील बारस्कर यांनी विचारला.
तपोवन रोडच्या कामासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरसेवक सुनील त्रिंबके, निखिल वारे, बाळासाहेब पवार यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या तक्रारीवरून नागपूरचे पथक या रोडची तपासणी करत आहे. ज्या वेळेस रस्ता खराब झाला त्यावेळीच आम्हीच संबंधित खात्याकडे तकार केली होती. माजी आमदारांनी कायमच विरोधकांची भूमिका घेतली आहे.
त्यांनी 25 वर्षांत केवळ ब्लॅकमेलिंग करण्याचे काम केले आहे. ज्या वेळी हा रस्ता जिल्हा परिषद हद्दीत होता त्यावेळी आ. जगताप यांनी त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र आणले. मुख्यमंत्री निधीतून तो रस्ता मंजूर करून घेतल्याचे बारस्कर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान विरोधकांना आता सांभाळणारे कोणी नसल्याने त्यांनी हे उद्योग सुरू केले आहेत. त्यांनी कायम राजकीय पोळी भाजण्याचे काम केले असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला.
माजी महापौरांना आपल्या वॉर्डातील साधे नगरसेवक देखील होता येत नाही, ही शोकांतिका आहे. महापालिकेचा त्यावेळी असलेला बाबू अधिकारी कोणाचे बिल भरायला जात होता, सांगण्याचे गरज नाही. लोकांना ते माहिती आहे. आता त्यांनाही सांभाळणारा कोणी राहिला नाही. त्यामुळे त्यांनी हा नवा उद्योग सुरू केल्याचा आरोप करताना बारस्कर यांनी अभिषेक कळमकर यांचा नामोल्लेख टाळत थेट टीकेचा बाण सोडला.