Wednesday, October 23, 2024
Homeनगरसत्ताधारी गटाची शकले उडण्याची 25 वर्षांपूर्वीची परंपरा यंदाही कायम

सत्ताधारी गटाची शकले उडण्याची 25 वर्षांपूर्वीची परंपरा यंदाही कायम

शिक्षक बँक || गुरुजींच्या सत्ताकारण नाट्याच्या पुढील अंकाकडे जिल्ह्याचे लक्ष

अहमदनगर | ज्ञानेश दुधाडे| Ahmednagar

दर पंचवार्षिकला बंडखोरी करत, मंडळ, श्रेष्ठी आणि नेतृत्वाला एकटे पाडत, विरोधकांच्या मदतीने जिल्हा शिक्षक बँकेच्या सत्तेच्या चाव्या ताब्यात घेण्याची परंपरा यंदाही कायम असल्याचे दिसत आहे. यामुळे जिल्ह्यातील 11 हजार गुरुजींचे सत्ताकारण असणार्‍या शिक्षक बँकेच्या राजकीय वर्तुळाचा पुढील नाट्यपूर्ण अंक काय राहणार याकडे जिल्ह्याचे नव्हे, तर राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे लक्ष राहणार आहे.

- Advertisement -

प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत हाणामारीच्या परंपरेची भेट (सुरूवात) नगर जिल्ह्यातील धूर्त गुरूजींनी दिलेली आहे. राज्यात सर्वप्रथम नगर जिल्ह्यातील गुरूजींच्या बँकेत सर्वसाधारण सभेत राडा झाला आणि त्याचे लोण राज्यभरात पसरत त्याठिकाणी ही परंपरा अखंडपणे आजही सुरू आहे. अशीच बंडखोरीची परंपरा नगरच्या शिक्षक बँकेच्या राजकारणात 2001 मध्ये सुरू झालेली. त्यावेळी सत्ताधारी सदिच्छा संचालक मंडळाचे तत्कालीन नेते, मंडळाने दिलेला आदेश नाकारात आपल्या सोयीनुसार संचालक मंडळाच्या बैठकीत बंड करत चेअरमन, व्हाईस चेअरमनची निवड केली होती. त्यावेळी पहिल्यांदा झालेल्या बंडाळीत आशाताई शिरसाठ यांनी चेअरमन आणि रावसाहेब सुंबे यांना व्हाईस चेअरमन होण्याची संधी मिळाली.

त्यावेळी नेते आणि मंडळाच्या विरोधात फितूर होऊन संचालकांनी बँकेची सत्ता हस्तगत करण्याची सुरू केलेली परंपरा आजही 24 वर्षांनंतर कायम आहे. त्यानंतर 2006 मध्ये सदिच्छा मंडळाच्या विरोधात नव्याने अस्तित्वात आलेल्या गुरूकुल मंडळाने शिक्षक बँकेच्या सत्तेवर नाव कोरले. त्यावेळी ऐक्य मंडळ त्यांच्या जोडीला होते. बँकेच्या राजकारणात डोईजड होणार्‍या ऐक्य मंडळाच्या नेत्यांना बाजूला सारून तत्कालीन गुुरुकुल मंडळाच्या नेत्यांनी ऐक्य मंडळाच्या संचालकांना फोडून आल्यासोबत घेतले. त्यानंतर बँकेच्या राजकारणात ऐक्य मंडळाचे झालेले नुकसान आजपर्यंत भरून निघालेले नाही.
2011 मध्ये बँकेत पुन्हा सदिच्छा मंडळाची सत्ता आली. त्यावेळी या मंडळाचा कारभार अनेक ज्येष्ठ शिक्षक नेते हाकत होते. यावेळी रावसाहेब रोहकले यांचे नाव चेअरमनपदासाठी सदिच्छाकडून फायनल केलेले असताना गोकुळ कळमकर यांनी आणि टीमने बंडखोरी करत रोहकले यांचा पराभव करत बँकेवर वर्चस्व मिळवले. बंडखोरीची परंपरा त्यावेळीही जोरात होती.

यानंतर सदिच्छा मंडळातून बोहर पडत रावसाहेब रोहकले आणि बापू तांबे यांनी गुरूमाऊली मंडळाची स्थापना करत शिक्षक बँकेवर सत्ता स्थापन केली. हा काळ 2015 चा होता. यावेळी मंडळात वर्चस्व वाद आणि बडा नेता कोण यावरून धुसफूस सुरू झाली. यावेळी काहींनी दोन्ही बाजूने हवा भरत रोहकले आणि तांबे यांना वेगळे पाडण्यात यश मिळवले. रोहकले यांच्या सेवानिवृत्तीनंतर बँकेच्या सत्तेसाठी रोहकले गटाच्या संचालकांनी तांबे गटासोबत हातमिळवणी करत सत्ता काबीज केली. त्यावेळीही बंडखोरी कायम होती. रोहकले पर्व संपल्यावर बँकेच्या राजकारणात तांबे पर्व सुरू झाले. 2022 च्या निवडणुकीत शिक्षक बँकेत तांबे यांची एकहाती सत्ता आली. त्यांनी सदिच्छा, गुरूकुलसह सर्व परांपरिक आणि नवीन शिक्षक मंडळाचा पराभव करत एकहाती सत्ता मिळवली. दरम्यान, अनेक शिक्षक नेते अथवा विरोधी गटाचे नेते रिटायर्ड झाले किंवा होण्याच्या मार्गावर असताना आता तांबे यांचे बँकेच्या राजकारणात एकहाती वर्चस्व राहील अशी परिस्थिती असताना काळाने पुन्हा युटर्न घेतला.

दरम्यान, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आपले उपद्रवमूल्य सिध्द करणारे राज्याचे नेते संभाजीराव थोरात यांनी नजर तांबे यांच्या गटाच्या संचालकावर गेली आणि त्यांनी संधीचे सोने करत गुरूमाऊलीच्या अभेद्य 21 संचालकांमध्ये फूट पाडून यातील 12 संचालकांना गळाला लावण्यात यश मिळवले. याचा परिणाम काल झालेल्या बँकेच्या नूतन संचालकांच्या निवडणुकीत दिसून आला आहे. सत्ताधारी संचालक मंडळात फूट पडत नेते आणि मंडळाने आदेश दिलेल्या उमेदवाराविरोधात काही संचालकांनी बंड करून विजय मिळवला. ही घटना शिक्षक बँकेच्या इतिहासाची पुनरावृत्ती ठरली आहे. या घटनचे पुढे काय पडसाद उमटणार, या राजकीय नाट्याचा पुढील अंक काय राहणार हे लवकरच समोर येणार आहे.

यांच्यावर कारवाईची घोषणा
दरम्यान, बँकेच्या पदाधिकारी निवडीनंतर गुरूमाऊली मंडळाकडून काही संचालक आणि नेत्यावर कारवाई करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यात बाळासाहेब सरोदे, रमेश गोरे, सूर्यकांत काळे, भाऊराव राहींज, शशिकांत जेजुरकर, अण्णा आभाळे, ज्ञानेश्वर शिरसाठ, संतोष राऊत, योगेश वाघमारे, माणिक कदम, कैलास सारोक्ते यांचा समावेश असल्याचे गुरूमाऊलीच्या नेत्यांनी सांगितले. हे संचालक गद्दार असून त्यांनी मंडळाशी प्रतारणा केली. त्यामुळे त्यांची संघ आणि मंडळातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, असे करून शिक्षक बँकेतील बंडखोरी अथवा फुटीची परंपरा खंड पावणार का? हा प्रश्न आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या