अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नाशिक शिक्षक मतदरसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज शेवटचा दिवस आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. दरम्यान, गुरुवार (दि.6) अखेर या मतदारसंघात 22 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. काल तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल झालेले असून यात नगरमधील आणखी दोघांचा समावेश आहे. यापूर्वी नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी नगर जिल्ह्यातून डॉ. राजेंद्र विखे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, दत्ता पानसरे, प्रा. भाऊसाहेब कचरे, अमृतराव (आप्पा) शिंदे यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे.
आतापर्यंत या मतदारसंघातून 22 उमेदवारी अर्ज दाखल झालेले असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघासाठी नाशिक, धुळे, नगर, नंदूरबार आणि जळगाव या पाच जिल्ह्याचे कार्यक्षेत्र आहे. यापूर्वी धुळ्यातील निशांत रंधे यांनी भाजपच्या नावे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अर्ज दाखल करण्यास आज 7 जून शेवटची मुदत असून अर्ज दाखल केल्यानंतर 10 तारखेला छानणी आणि त्यानंतर 12 जूनला दाखल अर्ज काढता येणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्षात 26 तारखेला मतदान होणार आहे. दरम्यान, काल तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले असून यात माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक आप्पासाहेब शिंदे (नगर), दिलीप डोंगरे (संगमनेर) आणि राजेंद्र निकाम (मालेगाव, नाशिक) यांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुती, विशेष करून भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. याचा या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे या मतदारसंघातून भाजप कोणाला संधी देणार याकडे राज्याचे लक्ष राहणार आहे. नगर जिल्ह्यातून मोठ्या संख्याने उमेदवारी अर्ज दाखल झालेले असून शेवटपर्यंत कोणाकोणाचे अर्ज राहणार, कोण माघार घेणार याकडे देखील सर्वांचे लक्ष राहणार आहे.
नगर जिल्ह्यातून विखे आणि कोल्हे या बड्या नेत्यांनी शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल केलेला आहे. दोघेही भाजपच्या बड्या नेत्यांपैकी असल्याने पक्ष कोणाच्या पारड्यात उमेदवारीची माळ टाकणार, तसेच भाजपची अधिकृत उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून कोण निवडणूक रिंगणात राहणार. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा काय परिणाम होणार यासाठी 12 जूनपर्यंत सर्वांना वाट पाहावी लागणार आहे.