Friday, November 22, 2024
Homeनगरसभेत यंदाही शिक्षकांचा गोंधळ

सभेत यंदाही शिक्षकांचा गोंधळ

सेवानिवृत्त संचालकांची थकबाकी || कर्जासाठी बनावट सह्या || लेखापरीक्षकांच्या विषयावर ओढाताण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत यंदा देखील गोंधळ, गरमागरमी, व्यासपिठावर माईकची ओढाताणची परंपरा कायम राहिली. यावेळी सेवानिवृत्त संचालकांच्या थकबाकीच्या विषयावर मोठा गोंधळ झाला. हा गोंधळ थांबत नाही तोच कर्जासाठी जामिनदारांच्या बनावट सह्या, लेखापरीक्षकांची नेमणूक यासह अन्य काही मुद्द्यावर सत्ताधारी विरोधात विरोधी संचालक आणि सभासद आमने-सामने आले. शिक्षकांच्या सभेत अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना शांत करत गोंधळावर पांघरूण घालण्याची वेळ आली. यावेळी विरोधी गटाच्या संचालकांनी सत्ताधार्‍यांची कोंडी करत अनेक प्रश्न उपस्थित केले.

- Advertisement -

जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची 81 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी नगरमध्ये अध्यक्ष दिलीप काटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सुरूवातीला प्रास्ताविकात अध्यक्ष काटे यांनी सोसायटीच्या आर्थिक कारभाराची माहिती दिली. विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे यांनी संचालक मंडळामध्ये कोणी निवृत्त सभासद शिक्षक असेल तर त्यांनी सभागृह सोडण्याची मागणी केली. यावेळी त्यांचा रोख संचालक भाऊसाहेब कचरे यांच्याकडे होता. या मागणीवरून सभेत गोंधळ उडाला. दोन्ही गटाच्या सभासदांनी व्यासपिठासमोर येत घोषणाबाजी करून गोंधळ घातला.

अखेर संचालक सूर्यकांत डावखर यांनी कचरे तज्ञ संचालक असल्याचा खुलासा केल्याने गोंधळ थांबला. दरम्यान, सभेत सेवानिवृत्त झालेले किती संचालक संस्थेचे थकबाकीदार आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावरून सभेत पुन्हा गोंधळ झाला. व्यासपिठावर येत घोषणाबाजी व माईकची ओढाओढी सुरू झाली. अध्यक्ष काटे यांनी त्या थकबाकीदार संचालकांचे नावे वाचुन दाखवली. त्यानंतर सेवानिवृत्त संचालकांकडून थकबाकीची वसुली का केली नाही असा प्रश्न करून त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव मांडण्यात आला. यावेळी एका महिला सभासदाने मी जामिनदार असलेल्या कर्जदाराने माझी बनावट सही घेऊन कर्ज घेतले व फेडले नाही त्याची वसुली माझ्या पगारातुन सुरू आहे, असा आरोप केला. यावरून पुन्हा काही काळ गोंधळ झाला.

अखेर अध्यक्ष काटे यांनी चौकशी करून संबधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. विरोधी संचालक बाबासाहेब बोडखे यांनी लेखा परिक्षकाला 75 लाखांचे शुल्क देऊनही संस्थेला 85 लाखांचा दंड कसा झाला असा सवाल करत संस्थेचे ऑनलाईन काम अपुर्ण असल्याकडे लक्ष वेधले. संचालक आप्पासाहेब शिंदे व महेंद्र हिंगे यांनी लेखा परिक्षणाचे शुल्क कमी घेणार्‍याकडे लेखा परिक्षणाचे काम द्यावे अशी मागणी केली, संचालक डावखर यांनी ती मान्य केली. सभेत संजय भुसारी, रामदास झेंडे, महेश दरेकर, संजय कानडे, रामदास जंजीरे, रमजान हवालदार यांनी विविध मुद्दे मांडले.

बँकेचे अहवाल वाचन सेक्रेटरी स्वप्निल इथापे यांनी केले व 23 मे 2023 रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे तसेच 2023 व 24 या संस्थेचे कामकाजाविषयीचा अहवाल वाचून मंजूर केला. 2023-24 चा ताळेबंद व नफा तोटा पत्रक मंजूर करून नफा वाटणीस मंजूरी देत अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. तसेच 2023-24 चा वैधानिक लेखापरीक्षकांचा अहवाल वाचून त्याची नोंद घेण्यात आली. तसेच लेखापरीक्षकांच्या दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे, तसेच जनता अपघात विमा, पॉलिसीचे नूतनीकरण करणे याबाबत विचार विनिमय करणे व अहवालात सुचवल्याप्रमाणे उपविधी दुरुस्तीबाबत विचार करणे व सहमत करणे, 2024-25 सालासाठी अंतर्गत लेखा परीक्षकांची नेमणूक करणे व 2024-25 सालासाठी वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे आदी विषय सभेत मंजूर करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष संजय कोळसे, संचालक धनजंय म्हस्के, चांगदेव खेमनर, सुरेश मिसाळ, अशोक ठुबे, अण्णासाहेब ढगे, चांगले खेमनर, काकासाहेब घुले, ज्ञानेश्वर काळे, धनंजय म्हस्के, सत्यवान थोरे, अनिल गायकर, कैलास राहणे, वसंत खेडकर, बाळासाहेब सोनवणे, अशोक कराळे, मनीषा म्हस्के, भाऊसाहेब कचरे, नंदकुमार दिघे, सेक्रेटरी स्वप्निल इथापे उपस्थित होते.

सभासदांची डिजिटल स्वाक्षरीचा समावेश करा
संचालक सुनील दानवे हे सेवानिवृत्त होऊन सुद्धा त्यांच्या नावावर कर्ज बाकी कशी, संचालक निवृत्त होण्याअगोदर त्याचे कर्ज भरून त्याने निवृत्त व्हायचे असते. सभासदांना वेगळा नियम आणि संचालकांना वेगळा नियम असा पायंडा कसा असा सवाल विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे यांनी उपस्थित केला. त्यानंतर जामिनदाराच्या खोट्या सह्या करून कर्ज घेतले जात असल्याचे समोर आल्याने सभासदांच्या डिजिटल स्वाक्षरी संगणक प्रणालीत समावेश करण्यात यावा. दिव्यांग सभासदांना दिली जाणारी कर्जावरील व्याजदरातील 1 टक्के सूट वाढवून देण्यात यावी, अशी मागणी सभेत करण्यात आली.

सवंग प्रसिध्दीसाठी चुकीचे मुद्दे
सभेत विचारलेल्या विविध प्रश्नांना अध्यक्ष दिलीप काटे यांनी उत्तर देत निरासरण केले. यावेळी सत्ताधारी संचालक विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना विरोधकांनी गोंधळ घातल्याने शिक्षकांच्या सभेला गालबोट लागले. अन्यथा सभा शांतते झाली असती. विरोधकांना मुद्दे नसताना ते सवंग प्रसिद्धीसाठी चुकीचे मुद्दे उपस्थित करून सभेत गोंधळ घालतात व संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. विरोधकांनी आत्मपरीक्षण करून आपली कार्यपद्धती बदलण्याची गरजेचे असल्याचे अध्यक्ष दिलीप काटे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या