सिन्नर | प्रतिनिधी Sinnar
तालुक्यातील धोंडवीरनगर परिसरात असलेल्या सॅक्रेट हार्ट पब्लिक स्कूलमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीची शिक्षकाने छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला असून यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील दापूर येथील ८ वर्षाची एक मुलगी गेल्या तीन वर्षांपासून सॅक्रेट हार्ट पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असून सध्या ती इयत्ता दुसरीत आहे. शाळेतून घरी आल्यानंतर मुलीने आईकडे याबाबत खुलासा केल्यानंतर सदर घटना उघडकीस आली. ‘सायकत प्रामाणिक’ नावाचा शिक्षक गेल्या काही दिवसांपासून वर्गात शिकवण्यासाठी येत असताना तिच्या केसांना हात लावणे, छाती व पाठीवर स्पर्श करणे असे कृत्य करत असल्याचे मुलीने आईला सांगितले.
सुरुवातीला आईने मुलीला पुन्हा असे घडल्यास तात्काळ कळवण्यास सांगितले. यानंतर सोमवारी (दि.१९) शाळा सुटल्यानंतर अॅसेंब्ली हॉलमध्ये असताना संबंधित शिक्षकांने पुन्हा मुलीच्या केसांना हात लावल्याचे व बाथरूमकडे जात असताना तिचा रस्ता अडविल्याचे मुलीने सांगितले. शिवाय वर्गात इतर जागा असतानाही ते मुद्दाम तिच्याच बेंचवर येऊन चिकटून बसत असल्याचे मुलीकडून आईला सांगण्यात आले. यापूर्वी त्याच वर्गातील मुलीच्या एका मैत्रिणीलाही संबंधित शिक्षकाकडून छेडछाड करण्यात आल्याची माहिती मुलीने दिली. या प्रकाराबाबत चौकशी करण्यासाठी आज (दि.२०) सकाळी मुलीची आई, मुलीचे मामा, मुलीची मावशी शाळेत गेले असता शाळा प्रशासनाकडून त्यांनाही दमदाटी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत वाईट उद्देशाने लैंगिक स्वरूपाचा स्पर्श केल्याचा आरोप असल्याने, हे प्रकरण पोस्को कायद्याअंतर्गत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सदर घटनेनंतर शाळेतील सर्वच परप्रांतिय शिक्षकांना बेदम मारहाण करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, घाबरल्यामुळे ते कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले नसल्याचे समजते. मराठी येत नसल्याने त्यांना त्यांची कैफीयत मांडता येत नसल्याची चर्चा आहे.




